मिरजेत तब्बल 68 लाखांचा मद्यसाठा ‘राज्य उत्पादन शुल्क’ने केला जप्त; साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल

0
521
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली. मिरज येथील मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावून तब्बल ६८ लाख ४१ हजार २८० रुपये किमतीचा गोवा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बनावटीचा मद्यसाठा पथकाच्या वतीने जप्त करण्यात आला. याप्रकरणी साताऱ्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका सहाचाकी वाहनातून पिण्याच्या पाण्याची वाहतूक करत असल्याचे भासवून विनापरवाना गोवा बनावटीचे मद्य विक्रीसाठी मिरजेतून घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील जमीर अकबर मकानदार (वय ३१) आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार (२७, बालाजीनगर, विजयनगर, पाडळी केस, सातारा) या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा आणि मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्र बनावटीचे मद्य विक्रीसाठी मिरजेतून जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागास मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून मिरज कार्यक्षेत्रामध्ये मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई केली. यावेळी वाहनाची तपासणी केली असता पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून विनापरवाना मद्यसाठ्याची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी वाहनचालक आणि सोबतच्या संशयितास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तब्बल ६५१ बॉक्स मधून ३३ लाख रुपये रुपयांचा मद्यसाठा आणि आयशर चारचाकी टेम्पो असा एकूण ६८ लाख ४१ हजार २८० रुपयांचे मुद्देमाल विनापरवान विक्रीसाठी जात असल्याचे आढळून आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे, उपाधीक्षक ऋषिकेश इंगळे, यांच्या नेतृत्वाखाली मिरजेचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे, प्रभात सावंत, अजय लोंढे, विनायक खांडेकर, स्वप्नील आटपाडकर, लक्ष्मण पवार, जयसिंग खुटावळे, उदय पुजारी यांच्या पथकाने केली.