इंच ना इंच जमीन पाण्याखाली येत नाही, तोपर्यंत काम करत राहणार : आ. महेश शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना १९९७ मध्ये मंजूर झालेली ही उपसा सिंचन योजना युती सरकार सत्तेतून जाताच बासनात गुंडाळली होती. कालांतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. बुद्धीभेदाचे व लबाडीचे राजकारण करत केवळ बोंबा मारणाऱ्यांकडे आता दुर्लक्ष करणार आहे. खटाव तालुक्यातील इंच ना इंच भूमी जोपर्यंत पाण्याखाली येत नाही, मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही तोपर्यंत काम करत राहणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी म्हंटले.

खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे १७५ कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट १ व लिफ्ट २ या योजनांचा शुभारंभ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी रणधीर जाधव, भरत मुळे, राहुल पाटील, अभयसिह राजेघाटगे, हरी सावंत, नवनाथ फडतरे यांच्यासह गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी व मार्केट कमिटीचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. शिंदे म्हणाले, कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना कदापिही परवडणार नाही, खटावच्या जनतेला कधीच पाणी मिळणार नाही अशी वलग्ना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची नेते मंडळी करत होती. परंतु, प्रामाणिकपणा व जनतेची सेवा करण्याची इच्छा असली की सर्व काही शक्य होते. येथील जनतेच्या सहकार्याने योजना पूर्ण करून हे आम्ही दाखवून दिले आहे. अद्यापही या मतदारसंघात काही गावे या योजनेच्या पाण्यापासून वंचित राहिली होती. त्यासाठी ३१ जानेवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जादा २.५ टीएमसी पाण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

५५ कोटी रुपये खर्चाच्या या लिफ्ट १ या योजनेअंतर्गत उत्तर भागातील अनपटवाडी, नवलेवाडी, नागनाथवाडी, ललगुण, शिंदेवाडी या वंचित गावांतील सुमारे ८०० हेक्टर लाभक्षेत्राला ०.५२३ घ.मी/ से. पाणी मिळणार आहे. तर १२० कोटी रुपये खर्चाच्या लिफ्ट २ या योजनेंतर्गत बुध, राजापूर तसेच वेटणे, रणसिंगवाडी, उंबरमळे, धावडदरे, निढळ या गावांना १ टीएमसी पाण्याची सोय होणार असून पाणी दरजाई तलावात जाणार आहे. नेर तलावाखालील गावांना २ टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार असल्याचे आ. शिंदे यांनी म्हंटले.