सातारा प्रतिनिधी | पुणे- सातारा महामार्गालगत असणाऱ्या बेंगरूटवाडी (खंडाळा) हद्दीत एका विहिरीत पडलेल्या मोराला खंडाळा तालुका रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी जीवदान दिले. विहिरीत उतरून घायाळ झालेल्या मोराला बाहेर काढून जंगलात सोडून दिले.
या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बेंगरूटवाडी (खंडाळा) खंबाटकी घाटात असल्याने जंगलातून पाण्याच्या शोधात आलेला मोर येथील विहिरीत पडला.
याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तत्काळ खंडाळा तालुका रेस्क्यू टीमचे सदस्य आनंद गुळुमकर, अजित खंडागळे व काका वाघमारे यांनी विहिरीत उतरून मोराला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. मोर विहिरीत बराच काळ राहिल्याने तसेच पावसामुळे बचाव न करता आल्याने घायाळ झाला होता. त्याच्यावर उपचार करुन नैसर्गिक अधिवासात सोडले.