सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरातील रहिवाशांकडून अनेक प्रकरणी कर आकारणी केली जाते. त्यामध्ये स्वच्छता, पाणीपट्टी, घरपट्टी आदी कराच्या माध्यमातून आकारणी करून त्यांना सुविधादी दिली जाते. मात्र, आता पालिकेकडून एक नव्या कराच्या आकारणीस सुरुवात करण्यात आल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०२३-२४ च्या करदेयक वितणामध्ये पालिकेने ‘उपयोगकर्ता शुल्क’ म्हणून नवीन कर आकारणी केली असून यामुळे नागरिकांमधून स्टेप व्यक्त केला जात आहे.
सातारा पालिकेकडून शहरातील नागरिकांकडून केल्या जात असलेल्या उपयोगकर्ता शुल्क आकारणीमुळे या नव्या आकारणीबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अशात सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल संपून दीड वर्ष होऊन गेली आहेत. तेव्हापासून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी कारभार पाहत आहेत.
यंदाच्या वर्षीपासून नवीनच ‘उपयोगकर्ता शुल्क’ आकारण्यात येत आहे. याबाबत काही नागरिकांनी सातारा पालिकेतील करवसुली विभागात विचारणा केली असता त्यांना संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या या नवीन कर आकारणीबाबत नागरीकडून संताप व्यक्त केला जात आहे.