सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी पाच केंद्रांना मान्यता दिली आहे. या केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत आजपर्यंत देण्यात आली होती. मात्र, त्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. यावर्षीही सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले आहे. मात्र, बाजारपेठेत ऐन दीपावलीच्या तोंडावर आणि त्यानंतर आजअखेर सोयाबीनचा भाव प्रतिक्विंटल चार हजार १०० ते चार हजार ३०० रुपये कमी निघाला.
प्रत्यक्षात बाजारपेठेतील हा भाव सोयाबीनच्या हमीभावापेक्षा (प्रतिक्विंटल चार हजार ८९२) कमी असल्याने शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांतून सोयाबीनची हमीभाव दराने खरेदी करण्याची केंद्रे सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शासनाच्या सहकार व पणन विभागाने जिल्ह्यात तालुका सहकारी खरेदी- विक्री संघ, बाजार समित्या आदी संस्थांच्या संयुक्त माध्यमातून, तसेच नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सातारा, फलटण, कराड, कोरेगाव व मसूर येथे सोयाबीन हमीभावाने खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे.
प्रारंभी या केंद्रांत सोयाबीन घालण्यास ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत होती. मात्र, प्रत्यक्षात खरेदी केंद्रे उशिरा सुरू झाल्याने सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या २८ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत ही मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविली. दरम्यान, जिल्ह्यातील कोरेगाव व फलटण येथील हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्रे प्रत्यक्षात सुरू झाली आहेत, तर मसूर व सातारा केंद्रात नोंदणी सुरू झाली आहे. कराडला अद्याप नोंदणीस प्रतिसाद मिळाला नाही.