उसाच्या शेतात आढळला सुमारे 8 महिन्याचा सडलेल्या अवस्थेत बिबट्याचा बछडा..!

0
310

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील उसाच्या शिवारात सध्या ऊसतोड सुरू आहे. ऊस तोडीवेळी अनेक वन्य प्राणी व त्यांची पिल्ले सापडत आहेत. या दरम्यान कराड तालुक्यातील कोळेवाडी
गावच्या हद्दीत उसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना सडलेल्या अवस्थेत बिबट्याचा बछडा रविवरी आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत बिबट्याची उत्तर तपासणी करून कोळे वनपाल कार्यालय परिसरात दहन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कोळेवाडी महसूल हद्दीतील तळी नावाच्या शिवारात शिवाजी भोसले यांच्या शेतात रविवारी ऊस तोडणी सुरू होती. यावेळी पाचटीत सडलेल्या अवस्थेत बिबट्या आढळून आला. याबाबत कोळेवाडी पोलिस पाटील उषा पाटील यांनी वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे वनपाल बाबूराव कदम, वनमजूर अरुण शिबे आणि सहकारी यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.

यावेळी उसाच्या वाळलेल्या पाचटीत सात ते आठ महिन्यांचा बिबट्याचा बछडा सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पाचटीत अडकल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. संबंधित बिबट्याचे शवविच्छेदन कुसूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी केले. अंदाजे २० दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परिणामी सडलेल्या अवस्थेत असल्याने नर की मादी जातीचा आहे. हे सांगता येणार नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.