सातारा प्रतिनिधी | जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या महिला रुग्णालयात सध्या छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) सुरु आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे येथील २२ पैकी तब्बल २१ खोल्यांमध्ये गळती सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. याचा शिक्षक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात २०१७-१८ मध्ये १०० बेडच्या तीन मजली महिला रुग्णालयास मंजुरी मिळाली होती. याठिकाणी सुसज्ज महिला व बालकांच्या कक्षासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला. त्यानंतर या इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. २०२० साली ही दोन माजली इमारत बांधण्यात आली. सध्या तिच्या तिसरा मजल्याचे काम सुरु आहे.
२०२१ मध्ये छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ही इमारत नवीन महाविद्यालयाचे काम होईपर्यंत देण्यात आली आहे. या ठिकाणी डीन केबिनसह २२ खोल्या आहेत. त्यातील २१ खोल्या गळत असून फक्त कार्यालयीन कामकाज सुरु असणारी खोली सुस्थितीत आहे.
कॉलेजच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रत्येक वर्ग, लॅबमध्ये गळती लागली आहे, पावसाचे पाणी बादल्यात साठवून फरशी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लेक्चर सुरु असणाऱ्या खोल्यामध्येही पाणी गळत असल्याने दोन-तीन बेंच सोडून विद्यार्थ्यांना तर एका बेंचवर तीन तीन विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. यावरून इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.