सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळतीचं ग्रहण लागले आहे. शहराच्या पूर्व भागास पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जल वहिनीला शाहू स्टेडियमजवळ मोठी गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. यानंतर जीवन प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने सोमवारी सकाळपासूनच गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
सातारा शहराच्या पश्चिम भागाला नगरपालिका तर पूर्व भागाला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. शाहू स्टेडियम जवळ जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे करंजे, गेंडामाळ या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने जीवन प्राधिकरणची यंत्रणा सोमवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाली. गळती लागलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले. यानंतर गळती काढण्याचे काम सुरू झाले.
सातारा शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या शाहू स्टेडियमजवळ पाणी पुरवठा अचानक गळती लागल्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा जीवन प्राधिकारणाच्यावतीने आज बंद करण्यात आला आहे. पाणी गळती काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणकडून देण्यात आली आहे.