कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मसूर परिसरात विविध ठिकाणी छापे टाकून दुधात भेसळ करून नागरीकांच्या जीवाशी खेळणार्या 9 जणांच्या रॅकेटचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 9 हजार लिटर भेसळयुक्त दुधासह केमिकल पावडर, तेल आणि भेसळयुक्त दुधाची वाहतूक करणारी 5 वाहने, असा 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या कारवाईत टाटा छोटा हत्ती, महिंद्रा जितो, पियागो अॅपे, छोटा हत्ती, मारुती रिटस् या वाहनांसह 9 हजार लिटर दुध, 10 लिटर पॅराफिन केमिकल, 45 किलो वे पिरॅमिट पावडर, 50 लिटर सोयाबीन तेल, असे दुध भेसळीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच दूध भेसळ करणार्या टोळीतील बजरंग पांडूरंग जाधव (रा. खराडे), गणेश सुनिल पनासे(रा. हेळगाव), सोमनाथ रंगराव कदम (रा. गायकवाडवाडी), शरद वामन घार्गे, सचिन शंकर यादव, गणेश सुभाष मसुगडे (तिघेही रा. नवीन कवठे), अर्जुन कुमार श्रीकांत गौतम, विवेक कुमार श्रीरामचंद्र गौतम, अजय कुमार गौतम (तिघेही रा. उत्तरप्रदेश) या संशयितांना जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालूक्यातील मसूर, परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या गावामध्ये काही लोक दुधात भेसळ करून भेसळयुक्त दुधाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एलसीब पथकास कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. एलसीबीच्या पथकाने शनिवारी दुपारी नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या ठिकाणी छापे मारून मोठी कारवाई केली आहे.
मसूर परिसरात दुधात भेसळ करून भेसळयुक्त दुधाची विक्री करणारे रॅकेट उध्दवस्त करण्यात आल्यानंतर नागरीकांना मोठा धक्का बसला आहे. गेली अनेक दिवस आपल्या जीवाशी खेळ सुरू होता, याची नागरीकांना कल्पनाच नव्हती. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे भेसळ करणारी टोळी जेरबंद झाली आहे. पोलिसांच्या कारवाईचे मसूर परिसरातील नागरीकांनी कौतुक केले आहे. त्याचवेळी उंब्रज पोलिसांच्या ढोंगी कार्यक्षमतेची लक्तरे निघाली आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, वंदना रुपनवर, प्रियांका वायकर, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, हसन तडवी, राकेश खांडके, सनी आवटे, गणेश कापरे, राजू कांबळे, मोहन पवार, विशाल पवार, शिवाजी भिसे, अविनाश चव्हाण, ओंकार यादव, स्वप्नील कुंभार, प्रविण कांबळे, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक, केतन शिंदे, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, अमृत कर्पे, पंकज बेसके, शिवाजी गुरव या पथकाने ही कारवाई केली.