सातारा प्रतिनिधी | भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा सभागृहाच्या आवारातील थोर नेत्यांचे पुतळे मोदी सरकारने हटविले आहेत. ते मूळ जागेवर पुन्हा बसविण्यासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा. हे जर त्यांना शक्य नसेल तर त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, असे माने यांनी म्हंटले.
सातारा येथे आज लक्ष्मण माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण जावलीकर, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ जाधव, कोषाध्यक्ष हरदास जाधव उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण माने म्हणाले, सातारा ही शिवछत्रपतींची राजधानी आहे. या राजधानीतील छत्रपती शिवरायांचे वारसदार राजघराण्यातील दोन्ही राजे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. थोर नेत्यांचे पुतळे हे मूळ जागेवर प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला पाहिजे.
हे पुतळे मूळ स्थितीत येण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे. त्याचे नेतृत्व या दोघांनी केले पाहिजे आणि हे शक्य नसेल तर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी बाहेर पडले पाहिजे. अन्यथा राजघराण्याचा वारसा सांगण्याचा अधिकार आमच्या दोन्ही लोकप्रतिनिधींना राहणार नाही. येत्या 22 जुलै रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. या पुतळ्यांच्या मुद्यावरून त्या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा लक्ष्मण माने यांनी दिला आहे.