सातारा प्रतिनिधी | माजी आमदार आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त लक्ष्मण माने यांचा आज सायंकाळी साताऱ्यातील सर्किट हाऊसमध्ये रूद्रावतार पाहायला मिळाला. त्यांना पत्रकार परिषद घ्यायला कर्मचाऱ्यांनी मनाई केल्यानंतर लक्ष्मण माने भडकले आणि सर्किट हाऊसच्या पायऱ्यांवरच त्यांनी ठिय्या दिला.
कर्मचाऱ्यांचे अशोभनीय वर्तन
‘उपराकार’ लक्ष्मण माने हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान केला आहे. अशा मान्यवर व्यक्तीशी शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांनी केलेले वर्तन अशोभनीय होते. एका महत्वाच्या विषयावर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. मात्र, नियम दाखवून त्यांना पत्रकार परिषद घेण्यास मनाई करण्यात आली.
सर्किट हाऊसच्या दारात पत्रकार परिषद
सर्किट हाऊस मधील कर्मचाऱ्यांचा हेकेखोरपणा पाहून लक्ष्मण माने यांनी सर्किट हाऊस च्या पायऱ्यांवर बसूनच पत्रकार परिषद घेतली. भटक्या-विमुक्तांना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावे, ही मागणी आणि लोकशाही संवर्धन यात्रे संदर्भात त्यांची पत्रकार परिषद होती.
माजी आमदार, पद्मश्री लक्ष्मण मानेंनी सर्किट हाऊसच्या दारातच घेतली पत्रकार परिषद; काय घडलं नेमकं…#Hellomaharashtra #Laxmanmane pic.twitter.com/HvbwCobqZZ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 23, 2023
साताऱ्यात ब्रिटिश आलेत काय?
विधान परिषदेचे माजी आमदार आणि पद्मश्री पुरस्कार व्यक्तीला पत्रकार परिषद घेण्यास रोखल्याने लक्ष्मण माने चांगलेच भडकले होते. साताऱ्यात पुन्हा ब्रिटिश आलेत काय? असा सवाल त्यांनी केला. मी इथेच बसतो म्हणत ते सर्किट हाऊसच्या पायऱ्यांवरच बसले. लक्ष्मण माने यांच्या आंदोलनालानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषद घ्यायला भटक्या-विमुक्तांना जागा मिळत नसेल तर लोकसभा, विधानसभेत प्रतिनिधित्व कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.