कराड प्रतिनिधी | देशभरात मंगळवारी ‘ॲडव्होकेटस् डे’ साजरा झाला. याच दिवशी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हार्टॲटॅक येऊन एक पक्षकार जागीच कोसळला. वकीलांनी त्यांना प्रथमोपचार देऊन कारमधून तातडीनं दवाखान्यान नेलं. वेळीच उपचार मिळाल्यानं आणि वकीलांच्या प्रसंगावधानानं त्यांचा जीव वाचला. जयवंत पोळ (वय ६५, रा. हजारमाची, ता. कराड), असं पक्षकाराचं नाव आहे.
वकीलांनी पक्षकाराला नेलं हॉस्पिटलमध्ये
घटना समितीचे पहिले अध्यक्ष आणि देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची जयंती मंगळवारी Advocates Day (वकील दिवस) म्हणून साजरी करण्यात आली. याच दिवशी कोर्टाच्या आवारात जयवंत पोळ नावाचा पक्षकार अचानक खाली कोसळला. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या ॲड. महादेव साळुंखे, ॲड. अनिकेत भोपते यांनी त्याच्या छातीवर दाब देउन त्यांना सावध केलं. तसेच ॲड. विशाल शेजवळ यांनी आपल्या कारमधून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
वेळेत मिळाले वैद्यकीय उपचार
हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या तातडीने प्राथमिक चाचण्या केल्या. त्यांना हार्टॲटॅक आल्याचं स्पष्ट झाले. समयसूचकता दाखवणाऱ्या वकीलांपैकी ॲड. महादेव साळुंखे यांनी त्या पक्षकाराची प्राथमिक माहिती काढली असता जयवंत पोळ यांची केस ॲड. सी. बी. कदम यांच्याकडे होती. तो पक्षकारही त्या वकीलांच्याच गावचा असल्याने ॲड. कदम यांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळविले.
वकीलांच्या तत्परतेची कोर्टात चर्चा
देशभरातील न्यायालयांमध्ये मंगळवारी वकील दिन साजरा होत असताना कराडमधील वकीलांनी हार्टॲटॅक आलेल्या पक्षकाराचा जीव वाचवला. त्याचा वकील कोण, हे न पाहता माणुसकी आणि कर्तव्य भावनेचं दर्शन घडवलं. त्यामुळे वकीलांमध्ये या घटनेची दिवसभर चर्चा होती. समयसूचकता दाखविणाऱ्या वकीलांचं कराड बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी कौतुक केलं.