सातारा प्रतिनिधी । दुचाकी वाहनांसाठी एमएच ११ डीएस ही ०००१ ते ९९९९ क्रमांकापर्यंतची नवीन मालिका आज शुक्रवारपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून आरक्षित करू शकतील. दरम्यान, दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असल्यास नियमानुसार तिप्पट फी भरून नोंदणी क्रमांक देण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
आज दि. १८ रोजी चारचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत धनाकर्षासह स्वीकारण्याची वेळ देण्यात आली होती. दरम्यान, दि. २२ ऑक्टोबरला दुचाकी वाहनांचे अर्ज क्रमांकासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत धनाकर्षासह स्वीकारले जाणार आहेत. ज्या आकर्षक क्रमांकासाठी एकच अर्ज प्राप्त झाला असेल, त्या अर्जदारास त्याच दिवशी आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल.
एकापेक्षा अधिक अर्जदारांनी अर्ज केल्यास कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जादा रकमेचे धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक आहे. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करेल, त्यास पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. उर्वरित अर्जदारांना धनाकर्ष त्वरित परत देण्यात येतील.