कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची वेळ बदली; आता ‘या’ वेळेपर्यंत सुरू राहणार स्मशानभूमी

0
725
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीत कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने कोणालाच त्रास होऊ नये यासाठी स्मशानभूमीमधील अंत्यसंस्काराच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता नवीन वेळेनुसार स्मशानभूमीत सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच अंत्यसंस्कार करता येणार आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे उभारलेल्या कैलास स्मशानभूमीचे संपूर्ण व्यवस्थापन गेली 22 वर्षे म्हणजे 8030 दिवस एकही दिवस बंद न ठेवता आणि करोना काळात सुध्दा दहा पटीने अंत्यसंस्काराचे काम वाढले असताना, सर्व जग बंद असताना सातत्याने विनातक्रार सेवा आणि कर्तव्य भावनेने सुरू आहे. यासाठी नागरिक सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत.

या स्मशानभूमीत एकूण 7 कामगार असून ते अत्यंत प्रामाणिकपणे स्मशानभूमीची देखभाल आणि स्वच्छता ठेवत असतात. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी कामगार मिळणे आणि ते टिकवणे फार अवघड असते. या प्रकारची कामे करणार्‍या व्यक्तींची संख्या फारच कमी असते. एखादा कामगार सोडून गेला तर दुसरा कामगार मिळत नाही. अशा वेळी आहे त्या कर्मचारी यांची काळजी घेऊन त्यांना टिकवून ठेवणे अवघड असते. या दुर्मिळ सेवकांची मानसिकता सांभाळणे आमच्या संचालकांबरोबर सर्व नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे.

यासाठी श्री बालाजी ट्रस्टने सर्व बाजुने विचार करून काही नियम आणि अटी स्मशानभूमीसाठी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार आता अंत्यसंस्कार करण्याची वेळ ही रोज सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते आणि रात्रीसाठी 2 कर्मचारी सेवेसाठी असतात. अंत्यसंस्कारची शेवटची वेळ ही रात्री 10 पर्यंतची असते. कारण ज्यावेळी रात्री 10 वाजता अंत्यसंस्कारासाठी मृत व्यक्तीला आणले जाते. त्यानंतर संपूर्ण विधी होण्यासाठी रात्रीचे 11 ते 11:30 वाजतात आणि त्यानंतर कर्मचारी घरी जातात.