संजीवनी शिक्षण संस्थेचे दातृत्व; कापील ग्रामपंचायतीला विनामोबदला परत केली लाखो रुपये किंमतीची जमीन

0
799
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कापील येथील संजीवनी शिक्षण संस्थेच्या नावे असणारी लाखो रुपये किंमतीची सुमारे 5 गुंठे जमीन संस्थेने पुन्हा ग्रामपंचायतीकडे विनामोबदला हस्तांतरीत करून संस्थेचे सचिव ए. आर. पाटील यांनी आपले दातृत्च दाखवून दिले आहे. गावात माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने गावातील धर्मशाळेची जुनी इमारत व मोकळी जागा सन 1983 मध्ये ग्रामपंचायतीने संजीवनी शिक्षण संस्थेला दानपत्र करून दिली होती. या ठिकाणी संस्थेने माध्यमिक विद्यालय देखील सुरू केले होते.तदनंतर सन 1995 मध्ये संस्थेला कापील-गोळेश्वर गावच्या मध्यावर दुसरी मोठी जागा मिळाल्याने संस्थेने हायस्कूलचे स्थलांतर नवीन जागेत केले.

हायस्कूल नवीन जागेत स्थलांतरित झाल्यावर गावातील जुनी धर्मशाळेची इमारत मोडकळीस आल्याने ती पाडण्यात आली.तेव्हा पासून संबधित जागा मोकळी पडून होती. सन 2019 च्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तत्कालीन सरपंच सौ.कल्पना गायकवाड व त्यांच्या सर्व सदस्य मंडळाने संस्थेच्या नावावर असलेल्या जागेत सुसज्ज ग्रामपंचायत इमारत बांधण्याचा निर्धार केला.त्यासाठी माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिणचे तत्कालीन आमदार पृथ्वीराज चव्हाण,तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे युवा नेते ॲड.उदयसिंह पाटील उंडाळकर,मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सुसज्ज ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी लाखो रुपयांचा निधीही मिळवला होता.

संजीवनी शिक्षण संस्थेच्या नावावर लागलेली धर्मशाळेची मोकळी जागा ग्रामपंचायतींकडे पुन्हा हस्तांतरीत करून द्यावी हा प्रस्ताव संस्थेला दिल्यानंतर संस्थेचे सचिव ए.आर.पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यानी लगेच सहमती दर्शवली होती. संजीवनी शिक्षण संस्था व ग्रामपंचायत यांनी यासाठी संबधित प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर जागा दानपत्राने संस्थेला दिली असल्यामुळे ती पुन्हा ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुणे येथील धर्मादाय न्यायालयात ग्रामपंचायतीने अपील करणे क्रमप्राप्त झाले होते.

गत 3 वर्षा पासून पुणे धर्मादाय आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सौ.कल्पना गायकवाड,उपसरपंच सौ.सुषमा देशमुख,ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे,धोंडीराम मोरे,तसेच संस्थेचे सचिव ए.आर.पाटील व त्यांचे सहकारी यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन न्यायालयाने संस्थेच्या नावे असणारी जागा पुन्हा कापील ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करण्याचा आदेश दिला होता.त्या आदेशानुसार संस्थेने स्वतःच्या नावावर असलेली सुमारे पाच गुंठे जागा पुन्हा ग्रामपंचायतीकडे विनामोबदला हस्तांतरीत करून आपले दातृत्व दाखवून दिले आहे.आता या जागेवर कापील ग्रामपंचायतीची सुसज्ज अशी इमारत होणार आहे.

जागा हस्तांतरणासाठी संस्थेचे सचिव ए.आर.पाटील,अध्यक्ष सर्जेराव निकम,तत्कालीन सरपंच सौ.कल्पना गायकवाड,उपसरपंच सौ.सुषमा शिवाजी देशमुख,ग्रामपंचायत सदस्य व कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे,धोंडीराम मोरे,संभाजी मदने, सदस्या सुनीता कुंभार,सौ.स्वाती सावंत,ग्रामविकास पॅनेलचे मार्गदर्शक पांडुरंग देशमुख,तानाजी गायकवाड,जगन्नाथ मोरे,भाऊसाहेब ढेबे,प्रल्हाद देशमुख,सुरेश जाधव,सावकार जाधव,अशोक जाधव,भाऊसाहेब जाधव,हणमंत पाटील,रवी सावंत,बाबासो जाधव,ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री.केंगार,विद्यमान ग्रामविकास अधिकारी सौ.कांबळे आदींनी परिश्रम घेतले.