‘दक्षिण मांड’च्या सिंचन सर्वेक्षणासाठी 1 कोटी 65 लाख निधी मंजूर; डॉ. भारत पाटणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी येवती उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून एक कोटी ६५ लक्ष रुपये मंजूर असून, लवकरच सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी म्हंटले.

कोल्हापूर येथील सिंचन भवन येथे कृष्णा खोरे कोल्हापूर अधीक्षक अभियंता व अधिकारी यांच्यासोबत डॉ. पाटणकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, “येवती उपसा सिंचन योजना निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या योजनेमुळे कऱ्हाड तालुक्यातील दक्षिण मांड खोरे, शिराळा तालुक्यातील गुढे, पाचगणी पठार व पाटण तालुक्यातील काही गावांमधील मिळून सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्र बंद पाइपलाइनद्वारे ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याची बचत होणार आहे. आटपाडी व तासगावनंतर या उपसा योजनेद्वारे समान पाणी वाटपाचा दुसरा टप्पा यशस्वी होत आहे.

सर्वेक्षणाची निविदा पूर्ण झाली असून, १७ व १८ सप्टेंबर रोजी डॉ. भारत पाटणकर आणि कृष्णा खोरे व टेंभू उपसा, तसेच जलसंपदा व जलसंधारण खात्याचे संबंधित अधिकारी हे स्वतः सर्वेक्षणासाठी एकत्रित पाहणी दौरा करणार आहेत.

या बैठकीस कृष्णा खोरेचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, वारणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता देवानंद शिंदे, स्मिता माने, उपविभागीय अभियंता अनिल लांडगे, मिलिंद किटवाडकर यांच्यासह पाणी संघर्ष चळवळीचे बाळासाहेब माने उपस्थित होते.