सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील गोरेगाव (निमसोड) येथील आनंदराव डोईफोडे यांना गावातील तिघा जणांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. याप्रकरणी भीतीपोटी आनंदराव डोईफोडे यांनी किटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्यावर सातारा येथील क्रांतीसिह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्युस कारणीभूत ठरल्या प्रकरणी माजी सरपंचासह अन्य दोघांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माजी सरपंच सुशिलकुमार पाटील, ज्ञानेश्वर पाटील तसेच रमेश कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माती उचलण्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन चिडून गावातील सुशीलकुमार दत्तू पाटील, ज्ञानेश्वर गोविंद पाटील व इतरांनी मारहाण केली होती. या मारहाणीची फिर्याद देण्यासाठी आनंदराव डोईफोडे पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन आल्याशिवाय फिर्याद दाखल करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर ते ग्रामीण रुग्णालयात गेले.
त्या ठिकाणी ‘पोलिसांचे पत्र असल्याशिवाय तुम्हाला प्रमाणपत्र देता येत नाही,’ अशा प्रकारे दोन्हीकडून कुचंबना झाल्याने डोईफोडे यांनी विषारी औषध प्राशन करुन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी त्यांचे बंधू अंकुश बाबुराव डोईफोडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले होते. त्यानुसार माजी सरपंच सुशिलकुमार पाटील, ज्ञानेश्वर पाटील तसेच रमेश कदम या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणास अटक झाली नसून आरोपींच्या मागावर पोलीस पथक आहेत.