कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल 3200 रूपये जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने आणि तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्सने सन २०२४-२५ या ऊसगाळप हंगामासाठी येणार्‍या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन व जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे.

शेतकरी सभासदांच्या हिताचा कारभार करणाऱ्या कृष्णा कारखान्याने व जयवंत शुगर्सने नेहमीच चांगला दर देऊन, शेतकरी सभासदांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचा गळीत हंगाम निवडणुकांच्या धामधुमीमुळे उशिरा सुरु झाला. अशावेळी सातारा जिल्ह्यात कोणता कारखाना ऊसाला किती दर देणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अशावेळी कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगर्सने सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडत, यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३२०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे.

कृष्णा कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामास २५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून, आजअखेर १७ दिवसांत १ लाख ८७ हजार ८०० मेट्रीक टन गाळप झाले असून, १ लाख ८१ हजार ६० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. तसेच जयवंत शुगर्सच्या यंदाच्या गळीत हंगामासही २५ नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून, आजअखेर १७ दिवसांत ९४ हजार २२० मेट्रीक टन गाळप झाले असून, ७७ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. सर्व ऊस उत्पादक व सभासदांनी पिकविलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.