कराड प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील एस. टी. बसस्थानक परिसरात मुख्य बाजारपेठेत दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व त्यांच्या इमारतीतील कृषी सेवा केंद्राला आज बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी पाण्याचे टँकर व वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथील दत्तात्रय महाजन यांनी कोरेगाव येथील प्रसिद्ध व्यावसायिक अनिल ढोले यांच्या ॲग्रो हायटेक समुहास भाडेतत्त्वावर कृषी सेवा केंद्र चालविण्यासाठी दुकान गाळे दिले आहे. खालील भागात दुकान गाळे असून वरील दोन मजल्यावर महाजन कुटुंबीय वास्तव्य करत आहेत. तेथे असणाऱ्या ॲग्रो हायटेक या दुकानातून धूर येऊ लागल्याचे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती महाजन कुटुंबियांना दिली.
यावेळी इमारतीतील घरामध्ये दत्तात्रय महाजन पत्नी सुधा महाजन यांना नागरिकांनी सुखरूप बाहेर काढले. पहाटेच्यावेळी एक क्षणात लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर आगीचे लोट व काळा धूर परिसरात पसरले. आगीमध्ये ५० हुन अधिक ल;लाखांचे नुकसान झाले आहे. आगीबाबत माहिती मिळताच पिंपोडे बुद्रुक येथील माजी सरपंच जनार्दन निकम, संतोष लेंभे यांचे पाण्याचे टँकर आणून त्यांच्यासह संजय महाजन, बाळासाहेब गार्डी, साहिल इनामदार व तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. वाई नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या बंबच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली.