सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी “कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, ज्येष्ठ सिने अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, एमटीडीसीच्या व्यवस्थापक श्रीमती शर्मा, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास प्रकल्पाचे सल्लागार सारंग कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटन यासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरण पूरक असला पाहिजे. पाणी प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पर्यटन विकास विभागाच्या कोयना जल पर्यटन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमात स्थानिक तरुणांना प्रातिनिधीक स्वरूपात रोजगाराची नियुक्तीपत्रे देण्यात आली.
उद्योग पळवले म्हणता, मग 5 लाख कोटींचे रोजगार आले नसते
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गस्थळे लपली आहेत. त्याचा विकास करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. कोयना जलपर्यटन प्रकल्पातून तर स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपूत्रांना बाहेर नोकरीसाठी जावेलागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योग पळवले म्हणतात, मग राज्यात पाच लाख कोटींचेटीं चेरोजगार आले नसते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज देणार : मुख्यमंत्री
जल पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मोठा वाव आहे. स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. या भागाच्या विकासासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता या बाबीही प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
1 लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे उद्योग परिषदेमध्ये करार
रोजीरोटी साठी गावापासून आई-वडिलांपासून, कुटुंबापासून, तरुणांना दूर जावे लागते. त्यांना रोजगारासाठी गाव सोडून जावे लागू नये, उलट गाव सोडून गेलेले पुन्हा आपल्या घरी यावेत, त्यांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध व्हावेत हा आपला उद्देश आहे. विकासात्मक काम करणारे शासन असल्यामुळे राज्यात अनेक पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. एक लाख 37 हजार कोटीचे प्रकल्पांचे दावस येथील उद्योग परिषदेमध्ये करार झाले आहेत. तीन लाख 93 हजार कोटींचे उद्योग राज्यात येत आहेत. पाच लाख कोटींची गुंतवणूक आपण राज्याच्या विकासासाठी आणली आहे. उद्योग वाढीसाठी उद्योगांना सर्वतोपरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.