सातारा प्रतिनिधी | कोरेगाव शहरात मंगळवारी नगरपंचायती कडून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात येणार होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी साडेचार वाजता महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम तूर्त थांबविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, मुख्याधिकारी विनोद जळक, पोलिस उपनिरीक्षक दीपिका मुसळे, महावितरण कंपनीचे अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. ए. पाटील यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
कोरेगाव शहरातील वाढते अपघात, होणारी जीवितहानी आणि वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने केलेल्या पत्रव्यवहाराच्या आधारे नगर पंचायतीकडून दि. २४ डिसेंबर आणि दि. १७ जानेवारी रोजी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये पथविक्रेते, किरकोळ व्यापाऱ्यांवर, संक्रांत आली. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रांताधिकारी नाईक यांना सोमवारी दुपारी बैठक बोलावण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली.