कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विनापरवाना सोयाबीन खरेदी करणार्‍यांवर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकर्‍यांची अडवणूक करणार्‍या आणि त्यांच्यावर अन्याय करणार्‍या व्यापार्‍यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे.

शेतकर्‍यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे व्यापार्‍यावर बुधवारी दुपारी 12 वाजता बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. बाजार समितीचा रितसर परवाना न घेता, विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईचे सत्र सुरुच ठेवले जाणार आहे.

सध्या सोयाबीनचा हंगाम सुरु असून, राज्य सरकारच्या ध्येय धोरणाप्रमाणे बाजार समितीचा रितसर परवाना न घेता, व्यापार केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याबाबत खातरजमा केल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या संचालक मंडळाने ठराव करुन सचिव संताजी यादव यांना कारवाईचे अधिकार बहाल केले आहेत.

बाजार समितीच्या मार्गदर्शक तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रीती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती अ‍ॅड. पांडुरंग भोसले, उपसभापती दिलीप अहिरेकर, माजी सभापती जयवंतराव घोरपडे, व्यापारी संचालक राहूल बर्गे व सुनील निदान यांच्या सूचनेनुसार बाजार समितीने सचिव संताजी यादव यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक स्थापन केले आहे. या पथकाने बुधवारी सकाळी कुमठे (ता. कोरेगाव) येथे छापा टाकून विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करणार्‍यावर कारवाई केली.

बाजार समितीच्या नियमाप्रमाणे उपलब्ध शेतमाल साठ्याच्या बाजार फी रकमेच्या आणि फी रकमेच्या तीन पट शास्ती लावून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये संबंधित व्यापार्‍याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला. या कारवाईत शासकीय पंच म्हणून सहकार अधिकारी जे. एन. साबळे, कृषी पर्यवेक्षक विजय बसव व डी. डी. कदम यांनी काम पाहिले. समितीचे वाठार स्टेशनचे शाखाप्रमुख जयसिंग जगदाळे व लेखापाल राजेंद्र शिंदे यांनी कारवाई दरम्यान पंचनामा केला.