कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत मोहिते वस्तीसमोर खासगी बस उलटून बसमधील १२ प्रवासी जखमी झाले झाल्याची घटना आज सकाळी घडली.
बोरवलीवरून कोल्हापूरला ही ट्रॅव्हल्स निघाली असता वराडे गावच्या हद्दीत चालकाचे बसच्या स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रॅव्हल्स बस पलटी झाली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी बोरिवलीहून कोल्हापूरकडे एक खासगी ट्रॅव्हल्स निघाली होती. ट्रॅव्हल्स सकाळी वराडे गावच्या हद्दीत तासवडे टोलनाक्यापासून काही अंतरावर असलेल्या मोहिते वस्तीनजीक आली असता त्यातील चालकाचा ताबा सुटला आणि बस महामार्गनजीक पलटी झाली. या खासगी बसमधून सुमारे २८ जण प्रवास करत होते. यातील बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर सुमारे पाऊण तास वाहतूक खोळंबा होवून सुमारे दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या. दरम्यान, क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल रस्त्यातून बाजूला करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. घटनास्थळी तळबीड पोलीस दाखल झाले असून त्यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.