सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून जिल्हास्तरावर महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली जात आहे. दरम्यान, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा गट देखील पक्षबांधणीत मागे नाही. सातारा जिल्हा म्हटलं कि खासदार शरद पवार यांचा आवडता जिल्हा असं म्हटलं जातं. या जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कमपणे उभी आहे. या जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या सातारा निरीक्षकपदी बारामतीचे किशोर मासाळ यांची निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली असून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी असलेल्या किशोर मासाळ यांच्यावर सध्या युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहेत. त्यांनी कर्जत-जामखेड मतदार संघात पक्षनिरिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी मागील विधानसभेत केली होती. अहमदनगर जिल्हा निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे.
सातारा जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असल्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त आमदार हे अजितदादा गटात गेले आहेत. अशात पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच युवक प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी किशोर मासाळ यांची जिल्हा पक्षनिरीक्षक म्हणून निवड केली आहे.