सातारा प्रतिनिधी | अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘वॉटर वारियर्स’ना दिल्ली येथे दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल येथील सरपंच अमोल काटकर यांचा सहभाग आहे.
राज्यातून दिपाली लोणकर, काऱ्हाटी (पुणे), सुधार मानकर, जरुडी, ता. वरुड (अमरावती), अमोल काटकर, किरकसाल, ता. माण (सातारा), सुनील गरड, खेड (धाराशिव), छायाताई कोळेकर, नानगोले, ता. कवठे महांकाल (सांगली) आणि शीतल झुंजारे, हरांगूल (लातूर) या वॉटर वारियर्सना दिल्ली येथे २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्तादिनानिमित्त होणाऱ्या पथसंचलन कार्यक्रमाकरीता ‘विशेष अतिथी’ म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनपद्धतीने ग्रामस्थांनी एकजुटीने कामे करुन दुष्काळग्रस्त ते आदर्श पाणीदार गाव अशी गावाची ओळख निर्माण केली आहे. योजनेच्या प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून गावच्या परिसरात रिचार्ज शॉफ्ट, मल्चिंग, स्प्रिंकलर, शेडनेट, पॉलीहाउॅस आदी पाणी बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना राबविण्यात आल्या. गावातील पाण्याबाबत ‘जलसुरक्षा आराखडा’ तयार करण्यात आला.
जलसाक्षरतेबाबत कार्यशाळा आयोजित करुन जनजागृती करण्यात आली. पर्जन्यमापक यंत्र, पिजो मीटर, वॉटर फ्लो मीटर, पाणी पातळी मोजण्यासाठी वॉटर इंडिकेटर यंत्र लावण्यात आले आहेत. भूजल माहिती केंद्र स्थापन करुन पाणी बचतीबाबत माहिती देण्यात आली. जलसंधारणाची विविध कामे करुन पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी शिवारात जिरविण्यात यश आले. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ अंतर्गत राज्यातून प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपये असे दोन्ही पुरस्कार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायतीला मिळाले आहेत, अशी माहिती भूजल सर्वेक्षण विभागाने दिली आहे.