किरण मानेंनी केला ठाकरे गटात प्रवेश; शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंनी दिलं ‘हे’ वचन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे साताऱ्याच्या भूमीतील सुपुत्र अन् अभिनेते किरण माने यांनी आज रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईतील मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याला सुषमा अंधारे, सुनील प्रभू यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी किरण माने आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवादही साधला. किरण माने यांनी यावेळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश करण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. मी एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे. मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो आणि राहील. मी संविधान वाचवण्यासाठी लढत आहे. आज राज्यातील आणि देशातील वातावरण गढूळ झाले आहे. भारतीय संविधान धोक्यात आहे, अशावेळी त्याविरोधात लढणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे हाच आहे. त्यामुळे या लढाईत त्यांच्या पाठिशी उभं राहणं महत्त्वाचं आहे. अनेकांना मी अचानक राजकीय भूमिका कशी काय घेतली, याचं आश्चर्य वाटेल. मात्र, मी पूर्ण विचार करुन हा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांची वैचारिक नाळ ही प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी जोडली गेली आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यास प्रजेचे हाल कुत्रं खाणार नाही, असे प्रबोधनकारांनी लिहून ठेवले आहे. आज तशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक सजग नागरिक म्हणून आपण सक्रियपणे राजकारणात उतरले पाहिजे, असे मला वाटले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी किरण माने यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांना पक्षात प्रवेश दिला. किरण माने हे राजकीय हेतूने नव्हे तर चाललेलं पाहवत नाही म्हणून शिवसेना पक्षात आले आहेत. मी तुम्हाला एवढंच वचन देतो की, तुम्ही शिवसेनेत आलात, याचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.