सातारा प्रतिनिधी | एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी अनुप नंदकुमार गाडे (वय ३८, रा. हॅपी होम सोसायटी, एमआयडीसी, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला डॉक्टर ३२ वर्षांच्या असून त्या साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. संशयित अनुप गाडे याने एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरला वारंवार फोन केला. तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांना जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्याने शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. ‘फोनवर बोलली नाहीस. माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या घरातील लोकांना जीवंत सोडणार नाही. घर पेटवून देईन’ अशी धमकी दिली.
सदरचा प्रकार १२ डिसेंबर २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत साताऱ्यातील एका हॉस्पिटलसमोर घडला आहे. दरम्यान, पीडित महिला डॉक्टरने बुधवारी (दि. २१) सायंकाळी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अनुप गाडे याच्यावर अपहरणासह विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.