पुसेगावात 4 वर्षांनंतर खिल्लार जनावरांचा बाजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणारा बैल बाजार लम्पी आणि इतर आजारांच्या सावटामुळे चार वर्षे भरला नव्हता. राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुसेगावच्या बैल बाजाराला ७५ वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी येणारे बैल हे उत्कृष्ट दर्जाचे असतात, अशी ख्याती आहे. बाजारात जातिवंत पशुधनाची संख्या उल्लेखनीय असते. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी तसेच व्यापारी खिल्लार बैल आणि पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात.

परिणामी यात्रा कालावधीत सुमारे ११ दिवस भरणाऱ्या या बैल बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तसेच या बैलबाजारात बैलगाड्या, औतकामाचे साहित्य, बैलांचे कासरे, छकडे, शेती आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राशी निगडीत साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन संबंधित शेतकऱ्यांसह छोट्या – मोठ्या व्यापाऱ्यांचा देखील चांगला फायदा होतो. सेवागिरी यात्रेच्या कालावधीत खरिपाची सुगी उरकून शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक उत्पन्न आलेले असते आणि रब्बीची पेरणी उरकून शेतीच्या कामांमधून थोडीशी उसंत मिळालेली असते.

बैलगाडी शर्यतीमुळे खिल्लार बैलांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, दरदेखील वाढले आहेत. बैलबाजारात बैलगाड्या, औतकामाचे साहित्य, बैलांचे कासरे, छकडे, शेती आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राशी निगडीत साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. जातिवंत खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुसेगाव यात्रेतील बैल बाजारात यंदा मोठी आर्थिक उलाढाल होऊन शेतकरी व व्यापाऱ्यांचा फायदा होणार आहे.