कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
भारताचे पहिले आॅलिंम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील जन्मगावी क्रीडा संकुल उभारणीसाठी क्रीडा विभागाने ५ आॅक्टोबर २०१८ मध्ये जमीन ताब्यात घेतली. त्यापासून आजपर्यंत १४ वर्षात क्रिडा संकुल होणे अपेक्षित होते. मात्र, क्रिडा विभागास साधी संकुलाची संरक्षक भिंत देखील पूर्ण करता आलेली नाही. आता उद्या गुरुवारी क्रिडा मंत्रींच्या उपस्थितीत पुण्यात बैठक होणार आहे. यात क्रिडा संकुलाच्या वाढीव निधी व बांधकामासंदर्भात नव्या प्रस्तावावर निर्णय झाल्यास खाशाबांच्या नावाने राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण संकुल उभारण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने या केंद्रासाठी सुधारित ६ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीचा नवा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असून, लवकरच त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. क्रीडा मंत्र्याच्या उद्या होणाऱ्या बैठकीत वर्तवली जात आहे.
२१ जून २००९ रोजी राज्य सरकारने सातारा जिल्ह्यात कन्हाड तालुक्यातील गोळेश्वर येथे खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा केली. तत्कालीन क्रीडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर आता १४ वर्षांनी नव्या क्रिडा मंत्र्यांनी कुस्ती संकुलाचा प्रश्न हाती घेतला आहे.
क्रीडा संकुलाबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय होणार : क्रीडा अधिकारी युवराज नाईक
खाशाबांच्या संकुलासाठी क्रीडामंत्री उद्या गुरुवारी बैठक घेणार आहेत. त्यामुळे संकुलाचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास सातारचे क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी व्यक्त केला. ही बैठक केवळ खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या उभारणीतील अडचणी सोडवण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे तोडगा निघेल, असे मत जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना व्यक्त केले.
11 प्रकारच्या योजनांचा समावेश
गोळेश्वर येथील कुस्ती संकुलात जिल्ह्यातील उत्कृष्ठ दर्जाचे व उत्तम पैलवान तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विशेष लक्ष दिले जाणार आहे. या संकुलात शासनाच्या 11 प्रकारच्या विविध योजनांतून सुविधा उभारल्या जाणार आहेत.
शासन नियुक्त क्रीडा मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण..
गोळेश्वर जेव्हा कुस्ती संकुल निर्माण होईल. तेव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार व्हावेत, यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक यांची मागणी करून पैलवानांसाठी शासन नियुक्त क्रीडा मार्गदर्शक व वस्तादांची नियुक्ती केली जाणार आहेत.
कुस्ती संकुलाबाबत क्रिडा मंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा : रणजित जाधव
ज्यांनी क्रिडा क्षेत्रात देशाचे नाव जगभर पोहचविले. त्यांच्या नावाने उभारण्यात येणाºया क्रिडा संकुलाच्या कामाकडे राज्य प्रशासनाकडून चौदा वर्षेपासून दुर्लक्ष केल जातयं. ही खुप मोठी शोकांतिका आहे. २०१७ मध्ये १५ गुंठ्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. कालांतराने क्रिडा संकुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च वाढलेला आहे. तो संकुलाचा खर्च 3 कोटींऐवजी सुमारे 7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या प्रकल्पासाठी 3 कोटी रुपये मंजूर आहेत. संकुलाच्या संरक्षक भीतीचे काम देखील अर्धवट ठेवण्यात आलेले आहे. उद्या होणाऱ्या क्रिडा मंत्र्याच्या बैठकीत क्रिडामंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित खाशाबा जाधव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
संकुलाचा खर्च तीन कोटींऐवजी सुमारे सात कोटी रुपयांवर
दि. २१ जून २००९ रोजी तत्कालिन महाराष्ट्र शासनाचे क्रिडामंत्री दिलीपराव देशमुख यांनी गोळैश्वर येथे खाशाबा जाधव यांच्या नावाने क्रिडा संकुल उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यानंतर संकुलासाठी जाहीर केलेल्या ९५ गुंठ्यांऐवजी केवळ ३८ गुंठेच जागा ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर खाशाबांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी कोर्टकचेऱ्या करूनही काहीही निर्णय झाला नव्हता. २०१७ मध्ये १५ गुंठ्यांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, संकुलाचा खर्च तीन कोटींऐवजी सुमारे सात कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सध्या या प्रकल्पासाठी तीन कोटी रुपये मंजूर आहेत.
असे असेल संकुलाचे स्वरुप
९५ गुंठ्यांमधील काही जागा रस्त्यासाठी जाणार आहे. मात्र, या जागेतील मोठा भूखंड तातडीने काम सुरु करण्यास उपलब्ध आहे. संकुलाची कमान आणि आतमध्ये आवारात खाशाबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. आतमध्ये भव्य हॉल असणार आहे. त्यात कुस्तीच्या दोन मॅट आणि एक मातीचा आखाडा असे नियोजन करण्यात येणार आहे. खेळाडूंच्या निवासाची, खाण्याची, व्यायामाची सर्व व्यवस्था येथे करण्यात येणार आहे.
क्रिडा संकुलासाठी पदकांचा करणार होते लिलाव…
अनेकदा पैलवान खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांनी क्रिडा संकूल उभारणीसाठी अनेक मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. मात्र शासनाच्या पोकळ आश्वासनांना कंटाळून त्यांनी खाशाबा जाधव यांनी मिळवलेल्या आॅलिम्पिक पदकाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारने याबाबत तातडीने पावले उचलत पदकाचा लिलाव करू दिला नाही.