कातकरी समाजातील प्रत्येक लाभार्थीला योजनांचा लाभ देणार : जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | प्रधानमंत्री जन- जाती आदिवासी न्याय महाअभियान ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून याअंतर्गत जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ११ विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे दीड तास देशभरातील कातकरी समाजबांधवांशी ऑनलाइन संवाद साधला.

मेढा (ता. जावळी) येथील कलश मंगल कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे व प्रधानमंत्री जन-जाती आदिवासी न्याय महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार हणमंत कोळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, गट विकास अधिकारी मनोज भोसले, र्धर्यशील कदम, वसंतराव मानकुमरे, सौरभ शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, ”आदिवासी समाज बांधवांना जातीचे दाखले, आधार कार्ड देण्याची मोहिम मिशन मोडवर राबविण्यात आली. जिल्ह्यात आदिम कातकरी समाज असून या समाजातील ८६० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. कातकरी समाजातील कुटुंबाना घरे नाहीत अशांना घरकूल योजनेच्या माध्यमातून घरकूल, वीज जोडणी, उज्वला गॅस, आधार कार्ड नोंदणी, शिधापत्रिका यासह विविध योजनांचे लाभ देण्यात आले आहेत. गावातच पंचनामे करुन त्यांना कागदपत्रे उपलब्ध करुन विविध योजनांचा लाभ देणे प्रशासनाला सुलभ झाले. पुढील काळात कातकरी समाजातील मुलामुलींना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगारही उपलब्ध करुन देण्यात येईल, असे डूडी यांनी म्हटले.

यावेळी पार पडलेल्या महाअभियानास जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने कातकरी समाजातील पुरुष व महिला उपस्थित होते. त्यांच्यासाठी आयोजित आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या करुन औषधोपचारही करण्यात आले. यावेळी प्रतिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

जिल्ह्यामधील 19 लाभार्थींना मोदींच्या हस्ते हप्ता वितरित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानादरम्यान दुपारी १२.१० ते १.४५ असा सुमारे दीड तास देशभरातील आदिवासी कातकरी समाजबांधवांशी ऑनलाइन संवाद साधला. विविध योजनांची माहिती देऊन योजना अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले. या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते देशभरातील एक लाख घरकुल लाभार्थींना पहिल्या हप्त्याचे ऑनलाइन वितरण करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १९ लाभार्थींचा सहभाग होता. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करुन कातकरी समाजबांधवांना थेट मोदींना पाहण्याची संधी मिळाल्याने लाभार्थींनी समाधान व्यक्त केले.