रंगीबेरंगी फुलांनी कासवंडचे पठार बहरले; 100 फूट खोल भुलभुलय्या गुहाही आकर्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीजवळील निसर्गरम्य कासवंडच्या पश्चिमेस असणारे सुमारे ७० एकरचं विस्तीर्ण पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे. सध्या पठारावर सप्तरंगी फुलांची उधळण झाली आहे. कास पठारावर फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पावले आता कासवंडच्या पठाराकडे वळू लागली आहेत.

येथील रानफुलांचे वैभव पाहण्यासाठी दूरहून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. याबरोबरच विविध प्रकारचे पक्षी, फळे, प्राणी व सरपटणारे जीव येथे आढळून येतात. निसर्गाचा हा अद्‌भुत ठेवा अनुभवण्यासाठी दूरहून पर्यटक येथे येत आहेत.

त्यामुळे या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून दर्जा द्यावा, यासाठी तत्कालीन सरपंच, पर्यावरणप्रेमी रवींद्र गोळे, विनायक पवार, सखाराम चोरमले, सर्जेराव पवार सातत्याने मागणी करत आहेत. सद्य:स्थितीला पाचगणी परिसरातील डोंगररांगा, पठारे विविध रानफुलांनी बहरू लागली आहेत. येथे रस्त्यासह अन्य विकासकामे करण्यात यावीत, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

शंभर फूट खोल भुलभुलय्या करणारी नैसर्गिक गुहा

कासवंड पठाराच्या पूर्व दिशेस जमिनीत शंभर फूट खोल भुलभुलय्या करणारी नैसर्गिक गुहा आहे. त्यासाठी तीन तासांची सफर आहे. या पांडवकालीन गुहेची सफर करण्यासाठी स्थानिक नागरिकदेखील पर्यटकांना मदत करतात; परंतु या गुहांमध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने पर्यटकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.