सातारा प्रतिनिधी | जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार (Kas Plateau) बहरू लागले आहे. अद्याप हंगाम सुरू नसला तरी पावसाने उघडीप दिल्याने पर्यटक कासला भेट देऊ लागले आहेत. सध्याच्या घडीला कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवी या फुलाने पठार व्यापले आहे. त्याच्याच जोडीला कोळी कारवी व इटारी कारवी ही फुलेही पर्यटकांना खुणावू लागली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तब्बल अडीच हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे.
सध्याच्या घडीला कास पुष्प पठारावर सात वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवी या फुलाने पठार व्यापले आहे. त्याच्याच जोडीला कोळी कारवी व इटारी कारवी ही फुलेही पर्यटकांना खुणावू लागली आहेत. या तीनही प्रकारांतील कारवी एक ते दोन महिने राहणार असून यावर्षी पर्यटकांना वेगळीच अनुभूती पहावयास मिळणार आहे. टोपली कारवीसह पठारावर चवर, दीपकांडी, आभाळी, सीतेची आसवे, सोनकी, तेरडा, भारांगी, धनगरी फेटा, तुतारी, कुमुदिनी तलावामध्ये कुमुदिनी यासह टप्प्याटप्प्याने कास पुष्प पठारावर वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलायला सुरुवात झाली आहे.
अधूनमधून उन्हाची उघडझाप झाल्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुले उमलायला मदत होणार आहे. सद्यस्थितीत काहीच प्रकारची फुले पठारावर उमलली आहेत. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी फुले कास पठारावर पर्यटकांना वेळोवेळी पाहायला मिळणार आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पठारावर पर्यटकांनी फुले पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अधिकृत कासचा हंगाम सुरू नसल्याने कास पठार कार्यकारी समितीकडून अल्प दरामध्ये पर्यटकांना कासवरील फुले पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दोन दिवसांमध्ये 60 ते 70 कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली.