सातारा प्रतिनिधी । जागतिक वारसा स्थळ आणि विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर (Kas Pathar Season 2023) फुलांचा सडा बहरण्यास सुरुवात झाली आहे. पठारावर सध्या विविध अशा आकर्षक रंगाच्या फुलांच्या कळ्या उमल्ल्या असून 10 ते 15 दिवसात या ठिकाणी फुलांचे मनमोहक दृश्य पाहायला मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात डोंगर, पठार या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यापैकी जागतिक वारसा स्थळात नोंद असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठारावर दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पठारांवर रानफुलांना बहर येतो. निळी, पिवळी, गुलाबी, पांढ-या अशा रंगीबेरंगी फुलांचा जणू सडाच पडतो. यंदा कास पठारावरील हंगाम दि. 1 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. दरम्यान पर्यटक आतापासूनच पठारावर हजेरी लावत आहेत. शनिवारी आणि रविवारी या दोन सुट्टींच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक पठारावर हजेरी लावत आहेत.
कास पठारावर विविध रंगी, आकर्षक फुले उमलल्यानंतर या ठिकाणच्या निसर्गाचे रूपडेच बदलून जाते. या फुलांवर पसरलेली धुक्याची दुलई त्यावर बागडणारी इवलीशी फुलपाखरे ही मन मोहवून टाकतात. या फुलांचा मनमोहक नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक कास पठारावर हजेरी लावत असतात. दोन-तीन महिन्यात लाखो पर्यटक पठारांना भेट देत असल्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले येथील अनेक व्यवसाय देखील बहरतात.
फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार (Kas Pathar Season 2023)
सातारा जिल्ह्यातील कास पठारावर (Kas Pathar Season 2023) सद्यस्थितीत गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर यासह अनेक प्रजातींच्या फुलाच्या कळ्या मल्लू लागल्या आहेत. या कळ्या उमलल्यानंतर येथे भरणाऱ्या फुलांचे सौंदर्य पाहण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. कळ्या पूर्णपणे उमल्ल्यानंतर येत्या काही दिवसात फुलांचे गालीचे तयार होतील. त्यामुळं कास पठारावर फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता कास पठारावरील फुलांच्या बहराचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
1 हजार हेक्टर क्षेत्रात कास पठाराचा विस्तार
सातारा शहरापासून 25 किमी, महाबळेश्वरपासून 37 किमी आणि पाचगणीपासून 50 किमी अंतरावर कास पठार हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता लक्षात घेता, UNESCO ने 2012 मध्ये याला जागतिक नैसर्गिक वारसा असलेलं स्थळ म्हणून घोषित केलं आहे. पुण्यापासून सुमारे १४० किमी अंतरावर असलेल्या या पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आकर्षक फुले येतात. या ठिकाणाला तुम्ही फुलांचा गालिचा देखील म्हणू शकता. इथे फुलांच्या आठशेहून अधिक प्रजाती आढळतात. हे पठार तब्बल 1 हजार हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. (Kas Pathar Season 2023)