कराडची महिला कारसेवक फक्त 200 रूपये घेऊन गेली होती अयोध्येला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | अयोध्येतील श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त संपूर्ण देशात आज जल्लोषाचे आणि भक्तिमय वातावरण असताना कार सेवकांच्या योगदानाचा देखील गौरव करण्यात आला. बाबरी पाडताना कराडमधील १०५ कार सेवक अयोध्येत घटनास्थळी कार सेवा करत होते. त्यापैकी एक असलेल्या विनया खैर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना आज ३० वर्षांपुर्वीच्या त्या घटनेला उजाळा दिला. लहान मुलं घरी ठेऊन त्या आपल्या नणंदेसह अयोध्येला गेल्या होत्या.

अयोध्येत 1992 मध्ये कमालीचा तणाव असताना महिला म्हणून कार सेवेसाठी जाणं धोक्याचं वाटलं नाही का, असा सवाल त्यांना केला असता विनया खैर म्हणाल्या की, माझे वय त्यावेळी ३५ होते. माझी दोन लहान मुलं होती. परंतु, पहिल्यापासूनच मी धीट सवभावाचे होते. माझी विवाहित नणंद अयोध्येला जाणार होती. तिच्या सोबत मामी तूही जा, असं भाचीने सांगितलं अन् मी त्याक्षणी तयार झाले.

मी अयोध्येला जाणार असल्याचे घरात कळल्यानंतर पतीने विरोध केला. मात्र, मी निर्णयावर ठाम राहिले. नणंद आणि मी अयोध्येला जायचा निर्धार पक्का केला. मग पतीचा नाईलाज झाला. परंतु, खर्चासाठी पतीने फक्त २०० रूपये दिले. कार सेवेसाठी जायचंच म्हणून पैशाचा विचार न करता आम्ही जाण्याची तयारी करून निघालो. साताऱ्यातून रेल्वेने गेलो.

विनया खैर यांनी अयोध्येत पोहचल्यापासून ते प्रत्यक्ष बाबरी पतनापर्यंतचा थरार सांगितला. त्या म्हणाल्या, अयोध्येत पोहचल्यानंतर पहिल्यांदा संपूर्ण अयोध्या नगरी फिरलो. त्यानंतर दोन दिवसांनी बाबरी मशिद परिसरात आलो. घटनेदिवशी बाबरी परिसरात मोठा जमाव होता. त्यात १० हजार महिला होत्या. महिलांना सर्वात अग्रभागी उभे केले होते. आमच्या समोर बंदुकधारी पोलीस होते. महिलांनी आजुबाजुला पडलेले दगड, विटांचे तुकडे पोलिसांवर भिरकावायला सुरूवात केली. त्यामुळे पोलीस बाजूला झाले आणि पुरूषांचा एक गट बाबरी मशिदीत घुसला.त्यांच्याकडे टिकाव, फावडी, कुदळी, लोखंडी पहारी, घमेली, पाट्या होत्या.

बाबरी मशिदीचे कुंपन तोडून कारसेवक मशिदीवर चढले. सायंकाळी पावणे पाचला मशिदीचा तिसरा ढाचा पाडला आणि बाबरीचे पतन झाले. त्याठिकाणच्या श्रीरामाच्या मुर्ती बाहेर काढल्या आणि त्यांची प्रतिष्ठापना केली . त्यावेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. बाबरी पाडल्यानंतर तेथील विटा देखील काही कार सेवकांनी आणल्या होत्या. कराड शहर आणि तालुक्यातील काही कारसेवक दोन दिवस तर काही कार सेवक तेरा दिवस अयोध्येत होते, अशा आठवणी विनया खैर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितल्या.

दरम्यान, बाबरी पतनात मृत्यू झालेल्या कार सेवकांना अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठादिनी कराडच्या चावडी चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि रामभक्त लक्ष्मीकांत मिनीयार शेठ यांनी सरस्वती, गणपती आणि लक्ष्मीची चांदीची प्रतिमा कार सेवकांना भेट दिली. श्रीराम प्रतिमेचे पूजन करून चार हजार लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच वेद शाळेतील लहान मुलांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून रामरक्षा, हनुमान चालीसा पठाण आणि आरती करण्यात आली. या कार्यक्रमाचे संयोजन शरद देव, दीनेश लद्दड, सुनील पावस्कर आणि नागेश कुलकर्णी यांनी केलं.

‘या’ कार सेवकांचा झाला सत्कार

सुनील पावसकर, प्रशांत तवर, शरद देव, सुनील कदम, अजय कळेकर, सुधीर शिंदे, गणेश शिंदे, नागेश कुलकर्णी, सौ. विनया खैर, समीर करमरकर, रवी साने, हणमंत गायकवाड, नितीन सुर्वे, मोहन साने, मकरंद गरूड, नितीन कुलकर्णी, संतोष देशपांडे, सुनील पद्माळे (कराड), श्रीकांत शेणेकर, दत्ता कार्वेकर, कृष्णत कदम, उत्तम धर्मे, संजय कापूरकर (रेठरे बुद्रुक, ता. कराड), नंदकुमार सपकाळ, अनिल उकिर्डे (कोळे, ता. कराड) यांचा सत्कार करण्यात आला. नाना पन्हाळकर, बाळू कचरे (कचरेवाडी, ता. पाटण), रामभाऊ गुरव (मसूर) यांनी देखील कार सेवा केली होती, तर दिवंगत बंडोपंत चव्हाण, अमृत डोईफोडे (कराड) हे कार सेवक आज हयात नाहीत.