सव्वा टनाचा युवराज अन् 7 फूट उंचीचा सोन्या ठरला आकर्षण; कराडच्या कृषी प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शेती उत्पन्न बाजार समितीने दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त भरवलेल्या कृषी, औद्योगिक प्रदर्शनात जातीवंत जनावरे शेतकऱ्यांचे आकर्षण ठरली आहेत. गडहिंग्लजमधील मुऱ्हा जातीचा सव्वा टनाचा रेडा आणि जतच्या खिलार सोन्या बैलाने सर्वांचे लक्ष वेधले.

कराडमध्ये सुरू असलेल्या यशवंत कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन चांगलेच बहरल्याचे पहायला मिळाले. प्रदर्शनात शेतीतील आधुनक तंत्रज्ञान तसंच पशु प्रदर्शनात जातीवंत जनावरं पाहायला मिळत आहेत.

युवराज, सोन्या ठरला प्रदर्शनाचे खास आकर्षण

गेल्या तीन दिवसांपासून कराडमध्ये यशवंत कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर जिल्ह्यातील हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) गावातील स्वप्नील पोवार यांचाव सव्वा टनाचा मुऱ्हा जातीचा धिप्पाड रेडा शेतकऱ्यांचं आकर्षण ठरला. ३८ महिने वयाच्या या रेड्याचं नाव युवराज आहे. यापूर्वी सहा प्रदर्शनांमध्ये युवराजनं पहिल्या क्रमाकांचं बक्षीस पटकावलेलं आहे. कराडच्या प्रदर्शनातही युवराज पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे.

उमराणीच्या सोन्याची वार्षिक कमाई ३५ लाख

जत तालुक्यातील उमराणी गावच्या विद्यानंद चन्नाप्पा आवटे यांच्या खिलार जातीच्या सोन्या बैलानंही शेतकऱ्याचं लक्ष वेधलं. जातीवंत खिलार बैलाच्या स्पर्धेतही त्यानं पहिला क्रमांक पटकावला. साडेसहा फूट उंच आणि साडेनऊ फूट लांबीच्या धिप्पाड सोन्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह तरुणांना आवरला नाही. खिलार जातीमधील हा सर्वात उंचीचा बैल आहे. त्याला रोज ३ डझन केळी, दिवसातून पाचवेळा हिरवा चारा, मक्याची ४० कणसं, असा खुराक दिला जातो. त्याच्या रेतनातून वर्षाला ३० ते ३५ लाखांचं उत्पन्न मिळतं. या बैलापासून पैदास झालेल्या वासरांना लाखो रुपयांची मागणी असते, असे विद्यानंद आवटे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.

युवराजचा खुराक पैलवानासारखा

स्वप्नील पवार यांनी हरिणायातून म्हैस खरेदी केली होती. म्हशीबरोबर चार दिवसांच्या रेड्यालाही आणलेले. तेव्हापासून त्याला पौष्टीक खुराक देऊन त्याचे देखील संगोपन केलेले. या रेड्याचे नाव त्यांनी युवराज असे ठेवले आहे. गोळी, सरकी पेंड, हरभरे, रताळी, गाजरं, असा त्याचा खुराक आहे. युवराजला २५ लाखाला मागणी आली होती.