कराड प्रतिनिधी । कराड आणि पाटण तालुक्यात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना या घडत असतात. अशा काळात आपत्ती व्यवस्थापन विभाग व NDRF पथकाकडून कार्यवाही केली जाते. सध्या कराड-पाटण तालुक्यात पाऊस झाला असला तरी अतिवृष्टीच्या काळात दरडी कोसळण्याच्या घटना गद्य असल्याचे लक्षात घेत त्याबाबत उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कराड- पाटणचे प्रशासन सज्ज झाले आहे. कराडला आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु करण्यात आला असून नैसर्गिक काळात माहिती घेण्यासाठी शंभरहून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी गत महिन्याच्या सुरुवातीस आपत्ती निवारण संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील दरडी कोसळणाऱ्या ठिकाणी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कराड तालुक्यात नदीकाठच्या गावांत उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये १ जूनपासून ते ३० डिसेंबर या सात महिन्याच्या कालावधीत शंभर कर्मचाऱ्यांकडून आपत्तीसंदर्भात माहिती घेतली जाणार आहे.
पाऊस पडायला सुरुवात झाली की नदी, ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असते. कधी काळी अतिवृष्टीमुळे काही गावांमध्ये पाणी तर काही पूल पाण्याखालीही जातात. परिणामी गावांचा संपर्क तुटतो. तर नुकसानीसह जीवितहानीही होण्याच्या शक्यता असते. पुरामुळे गावांचा संपर्क तुटल्यास प्रशासनाकडून मदतकार्य करण्यास अडथळा निर्माण होता. अशावेळी आपत्ती निवारणासंदर्भात ठोस उपाययोजना करणे गरजेचे असते.
कराडला काटेकोरपणे नियोजन : तहसीलदार विजय पवार
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आढावा बैठकीत घेण्यात आली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन संदर्भात त्यांनी महत्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. शिवाय शासनाकडून आलेल्या आदेशानुसार कराडला आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु करण्यात आला असून कक्षात अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कराडचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विजय पवार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
पूर नियंत्रण कक्ष देखील स्थापन
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण तसेच पूरनियंत्रण कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. यानुसार कराड तालुक्यात पूर नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच या काळात रात्रीच्यावेळी दूरध्वनी संदेश व बिनतारी संदेश घेणे त्याप्रमाणे तातडीने कार्यवाही करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये अधिकाराखाली सुमारे ९४ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन नोंदी
नैसर्गिक आपत्ती काळात पडलेल्या पावसाची नोंद करण्याचे काम नियुक्त केलेल्या संबंधित कक्षातील अधिकाऱ्यांकडून बारा ते पंधरा तासांत पाहिले जाणार आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पावसाची आकडेवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार आहे. हा कक्ष चोवीस तास कार्यरत राहणार आहे.
प्रत्येक दिवशी दोन जणांवर जबाबदारी
नैसर्गिक आपत्ती काळात प्रत्येक दिवशी सायंकाळी सहा वाजल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दोन कर्मचाºयांकडून माहिती घेतली जाणार आहे. या काळात त्यांना दोघांनाही नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक केलेले आहे.
कराड तालुक्यात पुराचा धोका असणारी गावे
कराड शहर, गोटे, कापिल, आटके, जाधवमळा, सयापूर, पाचवडवस्ती, गोळेश्वर, वारूंजी, टाळगाव, तांबवे, मालखेड, रेठरे खुर्द, म्होप्रे, आणे, येरवळे, चचेगाव, दुशेरे, शेरे, वाठार, रेठरे बुद्रूक, पोतले, कार्वे, कोडोली, पवारमळी, खुबी, गोंदी, खोडशी, साजूर या गावांना संभाव्य पुराचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
नियंत्रण कक्षात ‘या’ विभागांचा समावेश
१) तहसील कार्यालय
२) दुय्यम निबंधक कार्यालय
३) उपनिबंधक कार्यालय
४) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग
५) ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग
६) पंचायत समिती
७) शिक्षण विभाग
८) लघु पाटबंधारे विभाग
९) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग
१०) एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभाग
कामात दिरंगाई केल्यास होणार कारवाई
कराड तालुक्यातील पूर नियंत्रण कक्षात नेमणूक केलेल्या शंभर अधिकारी व कर्मचाºयांपैकी कुणाकडे कामात दिरंगाई झाल्यास सबंधितावर कडक कारवाईही केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये संबंधितावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
214 दिवस चालते आपत्ति व्यवस्थापनाचे काटेकोरपणे काम
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवते त्या त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून रोटेशन पद्धतीने काम पाहिले जाणार आहे. दि. १ जूनपासून ते ३० डिसेंबर या सात महिन्याच्या कालावधीत 214 दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांवर पूरस्थिती तसेच पडणाऱ्या पावसाची नोंद घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रत्येक गावात आपत्कालीन समिती
तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी आपत्कालिन समिती स्थापन केली जाते. यावर्षी देखील ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून पावसाळ्यात गावांतील गटर स्वच्छ करणे, शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत दक्षता घेणे, आपत्कालिन सुचना देणे व त्याची कार्यवाही करणे, पूर, दरड कोसळल्यास तत्काळ शासनास माहिती देणे आदी कामे या समितीकडून पाहिली जातात.
कराड तालुक्यातील नदीकाठची गावे
कराड तालुक्यात कोयना नदीकाठी तांबवे, साजूर, किरपे, केसे, म्होप्रे, साकुर्डी, येरवळे, चचेगाव, सुपने, वारूंजी तर कृष्णा नदीकाठी कालगाव, पेरले, भुयाचीवाडी, कोर्टी, खराडे, वडोली भिकेश्वर, कवठे, कोणेगाव, उंब्रज, शिवडे, तासवडे, बेलवडे हवेली, वहागाव, घोणशी, खोडशी, कराड, गोटे, शिरवडे, नडशी, कोपर्डे हवेली, सैदापूर, सयापूर, गोवारे, टेंभू, कोरेगाव, कोडोली, कार्वे, शेरे, गोंदी, रेठरे बुद्रूक, खूबी, गोळेश्वर, कापिल, रेठरे खुर्द, मालखेड, दुशेरे, आटके ही गावे आहेत.
पाटण तालुक्यात तब्बल 64 गावे दरडग्रस्त
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. तालुक्यात तब्बल ६४ गावे दरडग्रस्त आहेत. त्यामध्ये आंबेघर तर्फ मरळी (वरचे व खालचे), ढोकावळे, हुंबरळी (काटेवाडी), मिरगाव, जितकरवाडी, शिदुकवाडी, काहीर, हुंबरळी, वरंडेवाडी, धदामवाडी, जोतिबाचीवाडी, गुंजाळी (मान्याचीवाडी), दीक्षी, बोरगेवाडी (मेंडोशी), जुगाईवाडी, खुडूपलेवाडी, जितकरवाडी (जिंती), जोशेवाडी, बागलेवाडी, चोपडेवाडी (डावरी), पळसारी (कुसवडे), धनवडेवाडी- शिंदेवाडी (निगडे), झाकडे, धजगाव, मसुगडेनाडी, ताम्हिणी, पाडळोशी, जळव, पाबळवाडी, लेंडोरी (धनगरवाडा), लुगडेवाडी (केरळ), मिरासवाडी (शिरळ), गुजरवाडी (म्हावशी), काळगाव, चाफोली, आरल, मोरगिरी जुने गावठाण, विहे, डफळवाडी, केंजळवाडी, कळंबे, गायमुखवाडी, कुसखंड (शिंदेवस्ती), आंबवणे, बोंदी (गोजेगावबस्ती), तामिणे वाजेगाव धरणाचे आतील, जाईचीवाडी (बोंद्री), भातडेवाडी (जिंती), कवडेवाडी (जंगडी), घोट, बोर्गेवाडी, टोळेवाडी, आरल (निवकणे), आटोली-गुरेघर अंतर्गत कोकणेवाडी, गोकुळनाला (कामरगाव ), किल्ले मोरगिरी, नाटोशी (शिर्केवस्ती), चव्हाणवस्ती, बहिरेवाडी (डोरोशी), विठ्ठलराडी (धनगरवस्ती), शिरळ विठ्ठलवाडी (सणबूर), बाटेवाडी या गावांचा समावेश आहे.