कराड प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नमस्कार घरोघरी सांगा, असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार कराड उत्तरमध्ये भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार किरोली ते चाफळ दरम्यान कार्यकर्त्यांनी ‘नमस्कार बाईक रॅली’ काढली.
मोटरसायकल रॅलीत ॲड. महादेव साळुंखे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोरपडे, कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष संदीप बाबर, युवा नेते रणजीत साळुंखे, भोसलेवाडी ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे भोसले, संतोष पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाठार किरोली येथून बाईक रॅलीला सुरूवात झाली. मसूर, उंब्रज, चरेगावमार्ग चाफळ, अशी रॅली काढण्यात आली. ‘मोदी साहब तम आगे बढो, उदयनराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’! अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी गावोगाव जावून मोदींनी सर्वांना नमस्कार सांगितल्याची माहिती नागरीकांना दिली.
साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड उत्तरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या अभियानातून प्रचार धुरा सांभाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रॅली काढून मोदींचा नमस्कार गावोगाव सांगितला. या रॅलीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळाला.