कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे तासवडे एमआयडीसी येथील बेघर वस्तीसह परिसरात असलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. यामध्ये याइतजील परिसराचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युत खांबावर वृक्षांच्या फांद्या कोसळल्या तर पिके देखील भुईसपाट झाली आहेत.
सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. तासवडे येथील एमआयडीसी परिसरात वाऱ्यासह पावसाने बेघर वस्तीवरील घरावरील पत्रे उडाले. त्यामुळे काहीकाळ वीजपुरवठा देखील खंडित झाला. तसेच सुपनेसह किरपे, तांबवे, पवारवस्ती येथील परिसरातील ऊस, मका आदी पिके भुईसपाट झाली.
मागील दीड महिन्यात पाऊस आणि वाऱ्यामुळे जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षीच उन्हाळ्यात वळीवाचा पाऊस होतो. जोरदार वादळी वारेही वाहतात. त्यातच विजाही कोसळतात.
जिल्ह्यात सध्या वळीवाचा पाऊस पडू लागला आहे. त्याचबरोबर जोरदार वारेही सुटत आहे. यामुळे नुकसानीच्या घटना घडू लागल्या आहेत. मागील आठवड्यात तर पावसाचा पाटण आणि कराड तालुक्याला मोठा फटका बसला. यामध्ये नुकसानच अधिक झाले आहे.
तांबवे भागात विजेचे खांब वाकले
कराड तालुक्यातील तांबवे भागात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले तर काही ठिकाणी विजेच्या खांबावर व तारांवर वृक्षांच्या फांद्या कोसळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला.
अवकळीने झोडपलं अन ‘त्यांना’ केलं ‘बेघर’
कराड तालुक्यातील उंब्रजसह मसूर परिसरामध्ये सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसामध्ये मसूर रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अनेक वाहने अडकून राहिली. दरम्यान यावेळी अडकलेल्या एसटी महामंडळाच्या चालक वाहकांनी तसेच बसमधील प्रवाशांनी पडलेली झाड हटवण्यासाठी पुढाकार घेतला व रस्ता मोकळा केला. अचानक व जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे तासवडे एमआयडीसी परिसरामध्ये बेघर वस्ती मधील लोकांचे घरावरील पत्रे उडाले. यामुळे परिसरातील गरीब कुटुंब रस्त्यावर आली.
वाघोली परिसराला पावसाने झोडपले
कोरेगाव तालुक्यातील वाघोली परिसराला आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. सातारा जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जीवित व वित्तहानी झाली नसली तरी नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
वाईला मुसळधार
वाई शहरासह तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे भाजी मंडईसह शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली. सध्या शेतात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने बागायती शेतातील गहू, हरभरा, ज्वारी या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
खटावमध्ये पावसाची हजेरी
खटावसह परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. सायंकाळी पाच वाजल्यापासून अचानकच विजेच्या गडगडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे फळबागाचा तसेच अन्य शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाच्या आगमनानंतर वीज पुरवठा खंडित झाला आहे पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकजणांनी देऊळ तसेच मोकळ्या मंडपाचा आधार घेतला.
बिदाल परिसरात वादळी पाऊस
दहिवडी येथील बिदाल परिसरातील शेरेवाडीमध्ये सायंकाळी सहाच्या सुमरास सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले. वादळी वारा व पाऊस आल्याने शेरेवाडी येथील शेतकरी किसन बाबुराव भुजबळ यांच्या घरावरील पत्रा उडून धान्य व जीवन आवश्यक वस्तू भिजून मोठे नुकसान झाले. तसेच अनेक झाडे उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.