कराड प्रतिनिधी | कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल फोन चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गहाळ झालेले सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 15 मोबाईल शोधण्यात तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. त्यांनी शोधून काढलेले मोबाईल पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते सोमवारी मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल गहाळ होणे, चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गहाळ झालेले, चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, पोलिस उपनिरीक्षक सचिन भिलारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे, सचिन निकम यांनी बिहार, उत्तर प्रदेशसह राज्यातील औरंगाबाद, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांतून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन मोबाईल फोन जप्त केले. ते फोन पोलिस निरीक्षक जगताप यांच्या हस्ते आज मूळ मालकांना परत करण्यात आले.
पोलिस उपअधीक्षक ठाकूर, पोलिस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाबर, पोलिस उपनिरीक्षक भिलारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे, सचिन निकम यांनी ही कारवाई केली.