कराड प्रतिनिधी । कराड तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला अवघ्या चार तासांत चोरीस गेलेले दोन मोबाईल संच शोधून काढण्यात यश आले आहे. मोबाईल चोरी केल्याप्रकरणी सराईतास अटक करून त्याच्याकडून दोन मोबाईल व एक दुचाकी असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विजय अभिमान सानप (वय २६, रा. जुळेवाडी) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास संजयनगर, शेरेच्या हद्दीत कऱ्हाड- तासगाव रस्त्याकडेला फिर्यादी मोबाईल हातात घेऊन उभा असताना दुचाकीवरून (एमएच ५० जी ८०४४) आलेल्या अनोळखी व्यक्तीने त्याच्या कानफाडीत मारून ‘मोबाईल दे नाही तर तुला खल्लास करून टाकीन’ अशी धमकी देऊन मोबाईल लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील व डीबी पथकाने शेरेच्या हद्दीत शेणोली स्टेशन ते रेठरे कारखाना रस्त्यावर गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून जाणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. कारवाईत त्याच्याकडून पोलिसांनी ३५ हजारांचे दोन मोबाईल संच व ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करीत आहेत.