कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात सापडलेल्या जीबीएसच्या रुग्णामुळे तालुक्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाला असून आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, कराड तालुक्यातील संबंधित गावातील घरोघरी सर्व्हे करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांनी नुकत्याच दिल्या आहेत.
कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटील यांनी नुकतीच रुग्णालयात जाऊन GBS रुग्णांबाबत विचारपूस केली. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन घरोघरी सर्व्हे करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या आजाराबाबत लोकांत अफवा पसरू नये, यासाठी स्पीकरवरून जनजागृती करण्याच्याही सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
हातापायामध्ये गोळे, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण येणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाने त्या आजाराच्या अनुषंगाने सर्व्हे सुरू केला आहे. सर्वांनी स्वच्छ पाणी प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, भाजी स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन खावी, उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, पाणी उकळून प्यावे, स्वच्छतेबाबत दक्षता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.