कराड प्रतिनिधी | प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सातारा विभागातील ९०६ फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कृती समितीला किडे समिती म्हणणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्यांचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला.
खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्याऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे साताऱ्यात प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. प्रवाशांना खासगी वडापचा आधार घ्यावा लागला. सातारा विभागातील गाड्या ५७ हजार किलोमीटर न धावल्याने उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. कराड, वडूज, मेढा, फलटण, पारगाव-खंडाळा आगारात बंद शंभर टक्के यशस्वी झाला.
सातारा विभागातील ९०६ फेऱ्या रद्द
राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी आठवड्यापूर्वीच लाक्षणिक उपोषण करून मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले होते. मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय बेमुदत बंदमध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. आंदोलनामुळे जिल्ह्यातील ९०६ एसटी फेऱ्या रद्द झाल्या.
मुक्कामी गाड्या आल्यानंतर कर्मचारी आंदोलनात सहभागी
आदल्या दिवशी (सोमवारी) रात्री मुक्कामी फेऱ्या घेऊन गेलेले कर्मचारी सकाळी डेपोत आल्यानंतर तेही आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे सातारा विभागातील चार एसटी डेपोतून दिवसभरात एकही गाडी धावली नाही. तसेच आंदोलनावर तोडगा न निघाल्याने मंगळवारी रात्रीच्या मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी (४ सप्टेंबर) सकाळी पुन्हा विद्यार्थी आणि प्रवाशांचे हाल होणार आहेत.
गुणरत्न सदावर्तेच्या वक्तव्याचा निषेध
एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या बंदवर ॲड. गुणरत्न सदावर्तेंनी भाष्य करताना कृती समितीला ‘किडे समिती’ म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं एसटी कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी सदावर्तेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. दरम्यान, कराड, वडूज, मेढा, फलटण, पारगाव-खंडाळा आगारात शंभर टक्के बंद यशस्वी झाल्याचा दावा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.