कराड प्रतिनिधी | कराड येथील एसटी आगार मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे प्रवाशांची संख्या जास्त असते. त्याचा विचार करून महामंडळाने आणखी पाच नवीन बस दिल्या आहेत. त्याचे पूजन कर्मचाऱ्यांच्या हस्ते करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ, विक्रम हांडे, सागर पांढरपट्टे, सुरेंद्र जगदाळे, वैभव साळुंखे, प्रकाश भांदिर्गे, अनिल लटके, तानाजी शेळके, नूरज पाटील, प्रमोद पोळ, नितीन गुरव, जगन्नाथ शिंदे, सुरेखा साळुंखे, शुभांगी जामदार, मीना साळुंखे, श्रीमती पवार, अमित कोळी, अनिल सावंत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. या आगारातून दररोज सुमारे ५० हजारांवर प्रवाशांची ये- जा होते. बसच्या दररोज २८०० फेऱ्या होतात. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत येथे बसची संख्या तोकडी आहे.
कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून कोकणात, कर्नाटकात आणि पुण्या-मुंबईलाही सहज जाता येते. त्यामुळे येथे प्रवाशांचा मोठा ओघ असून, ग्रामीण भागाचे दळणवळणाचे अजूनही एसटी हेच साधन आहे. एसटी महामंडळाने ज्येष्ठ, विद्यार्थी, महिला यांना प्रवास तिकिटात सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीचे महत्त्व आजही कायम आहे. महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने प्रवाशांची संख्या दुप्पट वाढली आहे.
एसटी महामंडळाकडून येथील आगाराला नवीन एसटी बस देण्यात याव्या, यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र देऊन नवीन बसची मागणी केली होती. त्याचबरोबर आमदार मनोज घोरपडे यांनीही पाठपुरावा केला. त्याचदरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघ, शेतकरी संघटनेच्या वतीनेही अनिल घराळ आणि सहकाऱ्यांनी नवीन यासंदर्भात आंदोलन केले होते. सर्व पाठपुराव्यांची दखल महामंडळाने घेऊन नवीन पाच बस दिल्या. येथील आगारातील नवीन बसची संख्या दहा झाली आहे. नवीन बसचे पूजन चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.