कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी गाड्या असल्या तरी देखील अजूनही एसटी बसला पसंती मिळत आहे. मात्र, प्रवाशांच्या कमतरतेमुळे काहीवेळा एसटी बसेसच्या फेऱ्या बंद केल्या जातात. अशाच प्रकार कराड तालुक्यातील किरपे गावात घडला. तीन महिन्यांपासून किरपे गावात एसटी बस फिरकलीच नाही. एसटी नसल्याने गावातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. अखेर ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने कराड – किरपे एसटी बस सेवा विंग मार्गे सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा तीन महिन्यांनंतर पुन्हा पूर्ववत वेळेत सुरू झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली असून त्यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.
कराड तालुक्यातील विंग ते किरपे मार्गावरील पोतले येथील पाटीलमळा याठिकाणी पुलाचे काम सुरू होते. यामुळे सदर एसटी सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने ही बससेवा दोन ते तीन महिन्यांनंतर सुरु करण्यात आली आहे. सदर एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी किरपेसह परिसरातील ग्रामस्थ दोन महिन्यांपासून वाहतूक नियंत्रण संजय मिरजकर, कराड आगार व्यवस्थापक विक्रम हंडे, स्थानकप्रमुख सागर पांढरपट्टे, वाहतूक निरीक्षक राम वीर यांच्याकडे पाठपुरावा करत होते.
गावातील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जुन्या वेळापत्रकानुसार पुन्हा एसटी सेवा रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. कराड-विंग हॉटेल, येरवळे, पंतोजीमळा, पोतले, येणके, किरपे मार्गे सकाळी साडेसहापासूनच्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एसटीमुळे ग्रामस्थांसह, विद्यार्थ्यांचीही गैरसोय दूर झाली
कराड ते किरपे एसटीबस मध्यंतरी तीन महिन्याच्या काळात बंद ठेवण्यात आल्यामुळे गावातील वृद्ध ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. तिरपे गावात एसटी बस येत नसल्यामुळे परिसरातील तांबवे, सुपने या ठिकाणी विद्यार्थ्यांना व प्रवाशांना कधी पायी चालत तर कधी दुचाकीला हात दाखवून त्यावरून प्रवास करावा लागत असे. आता एसटी बस सुरु झाल्यामुळे दळणवळणाची सोया झाली असल्याचे किरपे गावातील नागरिक संजय देवकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.