कराड प्रतिनिधी । राजकीय पटलावर प्रचारामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होत असते. मात्र, काही परंपराही राजकारण्यांकडून पाळल्या जातात. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी जवळपास सर्वच मतदार संघात उमेदवारांचे प्रचाराच्या शुभारंभाचे नारळ फुटले आहेत. मात्र, या मतदार संघातील सर्वात महत्वाच्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात सध्या प्रचाराचा चांगलाच धुरळा उडत आहे. भाजप महायुतीकडून डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटले आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण आहेत. दोघांनीही कराड दक्षिणेतील विंगच्या हनुमानाला नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली आहे. आता विंगचा हनुमान आणि मतदार राजा कोणत्या बाबाला पावणार हे पहावे लागणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदार मतदार संघात विंग येथील हनुमानाला नारळ फोडून डॉ. अतुल भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. विंग येथील झालेल्या प्रचार सभेत दोन्ही बाबांनी एकमेकांवर टीका टिपण्णी करीत निशाणा देखील साधला. आता प्रत्यक्ष गावागावात मतदार बांधवांच्या भेटीगाठी घेऊनदोघांकडून मतदानाचे आवाहन केले जात आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे मागील १० वर्षांपासून कराड दक्षिणचे आमदार राहिलेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून डॉ. अतुल भोसले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वच्छ चेहरा हि त्यांची मुख्य बाजू आहे. तर दुसरीकडे डॉ. अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. साखर कारखाने, हॉस्पिटल, बँका, शाळा- कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे यंदाही कराड दक्षिणेत काटे कि टक्कर होणार हे नक्की. दरम्यान, कराड दक्षिणमधील दोन्ही मातब्बर बाबा प्रचाराचा प्रारंभ करताना मोठे शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. आधी देवाच्या पायावर डोके ठेवून आणि नारळ फोडून राजकीय युद्धाला दोघांनी देखील प्रारंभ केलेला आहे.
डॉ. अतुलबाबा भोसलेंकडून गावागावात भेटीगाठी
महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्याकडून कराड दक्षिण विदानसभा मतदार संघातील घारेवाडी, किरपे, येणके गावात नुकताच प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांनी संवाद साधत गावागावातील जिल्हा मार्ग, पाणंद रस्ते, गटर बांधणी, पूल उभारणी अशी विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. कराड दक्षिणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटीबद्ध असून, या निवडणुकीत आपण मला भक्कम पाठबळ द्याल, याची मला खात्री असल्याचे म्हंटले.
पृथ्वीराज चव्हाणांकडून शहरात प्रचार
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी नुकताच संवाद साधला. या भेटीच्या दौऱ्यात त्यांनी व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला.
विंगचा हनुमान
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विंग या गावातील ग्रामपंचायतीशेजारी हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. जुने मंदिर दगडमातीचे होते. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. मात्र, मंदिरातील मूर्ती पुरातनच आहे.
२०१९ च्या विधानसभा निकालांमुळे यंदाची लढत रंगतदार
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे डबल इंजिन सरकार असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांचा निसटता विजय झाला. यावेळी भाजपाच्या डॉ. अतुल भोसले यांनी तब्बल ८३ हजार १६६ मते घेतली. तर पृथ्वीराज चव्हाण यांना ९२ हजार २९६ मते मिळाली. चव्हाण यांच्याकडे ९०५० मतांचे मताधिक्य होते. तर माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह विलासराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत २९ हजार ४०१ मते घेतली.