कराड प्रतिनिधी । मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेच्या नगर अभियंत्यासह एका व्यक्तीला 30 हजारांची लाच घेताना ACB लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली होती. ताब्यात घेतल्यानंतर दोघांना आज दुपारी कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेचा नगर अभियंता शशिकांत सुधाकर पवार (वय 37, मूळ रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण, जि. सातारा) व सुदीप दीपक इटांबे ( वय 29, रा. माऊली कॉलनी,मलकापूर ता. कराड) या दोघांनी एका दुय्यम ठेकेदारकडे 42,000 रुपयांची मागणी केली होती. यातील तक्रारदार हे दुय्यम ठेकेदार असून त्यांची फर्म असून तक्रारदार हे मूळ ठेकेदारांच्या फर्म अंतर्गत ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदार यांनी वाखाण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम केले होते. त्याचे एकूण 21 लाख 75 हजार रुपये बिल झाले होते.
त्यापैकी 15 लाख रुपये तक्रारदार यांना मिळाले होते. मात्र, उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करणे बाकी होते. यासाठी दोघांनी करण्यासाठी 42,000 रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर शशिकांत पवार यांनी तडजोडीअंती 30 हजार रुपये रक्कम खासगी इसम सुदीप दीपक एटाबे याच्याकडे देण्यास सांगून खासगी इसम एटाबे याचे करवी लाचेच्या रकमेचा स्वीकार केला. म्हणून आरोपी लोकसेवक शशिकांत पवार नगर अभियंता मलकापूर नगरपरिषद व खासगी इसम सुदीप एटांबे यांना 30,000 रुपये लाचेच्या रक्कमेचा स्वीकार करताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
दरम्यान, शशिकांत सुधाकर पवार व सुदीप दीपक एटाबे या दोघांना आज कराड येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पोलिसांकडून संबंधित आरोपींची कसून चौकशी केली जाणार आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य, पो. ना. प्रशांत नलावडे, पो. ना. निलेश चव्हाण, पो. शि. तुषार भोसले, चा. पो. ना मारुती अडागळे यांनी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.