कराड प्रतिनिधी । आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या कराड येथील प्रीतिसंगमावरील बागेची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे. वाढलेले गवत, मोडकळलेली बाकडी, बंद पडलेले कारंजे, घोणस सर्पाचा तसेच नदीत मगरीचा वावर अशा अनेक समस्यांमुळे नागरिकांमधून पालिकेबाबत संताप व्यक्त केला जातोय. या समस्याकडे लक्ष देण्याऐवजी, त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी कराड पालिका प्रशासनाचे मात्र, उद्या दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याकडे लक्ष लागले आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून दिल्लीत स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या कराड पालिका प्रशासनाने स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ असलेल्या प्रीतिसंगमाकडेच मात्र दुर्लक्ष केले आहे.
कराड शहरात अनेक स्वच्छतेची कामे करून कराड नगर पालिकेने सण 2024 रोजी घेतलेल्या स्पर्धेत देशाच्या पश्चिम विभागात पुन्हा एकदा बाजी मारली आहे. याबद्दल उद्या पालिकेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराने गौरव होत आहे. मात्र, कराड शहरातील सध्याची स्थिती पाहता व प्रीतिसंगमावरील वाढलेले गवत, परिसरात पडलेल्या कचऱ्यामुळे पसरत असलेली दुर्गंधी पाहता कराड पालिकेने नेमकी काय स्वच्छता केली? असा प्रश्न निर्माण होत आहे.
कराड येथील कृष्णा-कोयनेच्या संगमावरील प्रीतिसंगम बाग म्हणजे जिल्ह्यातील महत्त्वाचं पर्यटनस्थळ. दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळामुळेही या बागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण सध्या या बागेचं नाव काढताच प्रत्येकाला धडकी भारत आहे. कारण गेल्या महिनाभरात तब्बल पंधरा-वीस घोणस साप या बागेत आढळून आले आहेत. कराडकरांच्या जिव्हाळ्याची ही बाग स्वामींची बाग कमी आणि सर्वोद्यानच असल्यासारखी वाटत आहे. यामागचे कारण म्हणजे पालिकेचे असणारे दुर्लक्ष होय. बागेतील स्वच्छतागृहातील अस्वच्छता, पर्यटकांना बसण्यासाठी ठेवण्यात आलेली सिमेंटची मोडकळलेली बाकडी, प्रीतिसंगमभोवती बांधलेल्या दगडी भीतीवर चढलेले वेल त्यातून वावरणारे सर्प यामुळे या प्रीतिसंगमावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील काही दिवसात कमी झाली आहे.

मोडकळलेली सिमेंटची बाकडी पर्यटकांनी बसायचं कुठे?
कराड येथील प्रीतिसंगमावर कराड पालिकेच्या वतीने पर्यटक तसेच शहरातील नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडे बसवलेली आहेत. मात्र, सध्या या बाकड्याची दुरावस्था झाली आहे. सिमेंटची बाकडी ठीक ठिकाणी मोडकळलेली असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने याबाबत पर्यटक व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

गवत वाढल्याने सर्पांचा जीवास धोका
प्रीतिसंगमावरील स्वामींच्या बागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. कृष्ण आणि कोयना नदीच्या काठावर असणाऱ्या बागेत नदीतून सर्प तसेच इतर जीव जंतू येण्याची अधिक शक्यता असते. या ठिकाणी महिनाभरात तब्बल वीस सर्प आढळून आले असून घोणस सारख्या विषारी सर्पामुळे प्रीतिसंगम बाग जवळपास महिनाभर बंद ठेवण्यात आलेली होती.

उलट्या लटकणारे वटवाघुळाचा धोका अधिक
स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावरील स्वामींच्या बागेत उंचच्या उंच वृक्ष आहेत. त्या वृक्षांवर आजही गेल्यास उलट्या लटकळलेल्या वटवाघूळांची संख्या अधिक पाहायला मिळते. या ठिकाणी पालिकेकडून लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, त्याठिकाणी पावसामुळे पाणी साचले आहे. अनेक खेळाचे साहित्य मोडकळलेले असल्यामुळे मुलांनी खेळायचं कुठं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय वटवाघूळांची भीती देखील वाटत आहे. कोयना नदीत असणाऱ्या मगरीच्या वावरामुळे देखील या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना भीती वाटत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रीतिसंगमावरील बागेतील समस्यांकडे लक्ष दिले जाईल : मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर
कराडच्या प्रिस्तीसंगमाची दुरावस्था झालेली असताना दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करून घेण्यासाठी गेलेल्या मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याशी ‘हॅलो महाराष्ट्र’ने संवाद साधला. यावेळी गेली आठ ते सहा वर्षांपूर्वी नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडे ठेवण्यात आली आहे त्याबाबत लवकरच पालिकेकडून नवीन बाकडी बसवली जातील तसेच बागेत सर्प वाढल्यामुळे महिनाभर बाग बंद ठेवण्यात आली होती. या सर्पाचा सर्प मित्रांकडून बंदोबस्त करण्यात आला आहे. नदीकाठ असल्यामुळे नैसर्गिक अधिवासामुळे या ठिकाणी सर्प हे येण्याचे प्रमाण राहणारच तसेच पहिले तर कराडपासून खाली टेम्भूपर्यंतच्या नदीकाठच्या क्षेत्रात सर्प आढळून येत असतात. या ठिकाणी पालिकेकडून कचरा, वाढलेले गवत काढण्याकडे लक्ष दिले जात असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
पालिकेने समस्यांकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात : सुधीर कुंभार
घोणससह इतर सर्प आढळल्यामुळे कराडची प्रीतिसंगम बाग गेली महिनाभर बंद ठेवण्यात आली होती. या गवत वाढल्यामुळे सर्प देखील येण्याचे प्रमाण वाढले होते. पालिकेने त्या सर्पांना पकडून सुरक्षितस्थळी सोडले आणि प्रीतिसंगम बाग नागरिकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली असली तरी मात्र या ठिकाणी येणारे वयोवृद्ध, लहान मुलांच्या मनामध्ये सर्पांविषयी अजूनही भीती आहे. पालिकेने या ठिकाणी समस्यांकडे लक्ष देऊन उपाययोजना करून सकारात्मक प्रबोधन करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया कराड येथील सर्प अभ्यासक सुधीर कुंभार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.