कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलिसांनी सोमवारी रात्री बसस्थानक परिसरात मोठ्या फौजफाट्यासह अचानक कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवली. परंतु, ही कारवाई “डोंगर पोखरके उंदीर निकाल्या”, अशी ठरली. अवघ्या १८ केसेस करून पाऊण लाखांचा दंड वसूल करण्यात आला. या टीचभर कारवाईची पोलिसांनी हातभर प्रेसनोट काढून स्वतःची पाठ थोपटून घेतली.
मराठीतील गाजलेल्या ‘धुमधडाका’ चित्रपटात अशोक सराफांचा ‘डोंगर पोखरके उंदीर निकाल्या’, असा डायलॉग आहे. याचा अर्थ काम छोटं अन् फुशारकी मोठी! डीवायएसपी ऑफिस आणि शहर पोलिसांच्या कारवाईची गत या डायलॉग सारखीच आहे. सातारा बसस्थानक पोलीस चौकीतील एका पोलीस अंमलदारावर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवलं. पण, कारवाईपेक्षा दंगाच जास्त, असा प्रकार पाहायला मिळाला.
कराड शहर पोलिसांनी बसस्थानक परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून जुगार कायद्यान्वये 8 कारवाया करत 75,675 रूपयांची रोकड आणि मुद्देमाल जप्त केला. कोप्ताच्या 5 आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांसह 5 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
डीवायएसपी अमोल ठाकूर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस, वाहतुक शाखा आणि उपविभागीय कार्यालयातील 8 अधिकारी, 25 पोलीस अंमलदार, RCP चे एक पोलीस अधिकारी आणि 12 कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. जुगार आणि ऑनलाईन लॉटरी चालविणारांवर केसेस करून 75,675 रोकडसह मुद्देमाल जप्त केला. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
गुन्हेगारांच्या हालचाली पडताळून 5 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच विकास भंडारे, अक्षय सोळवंडे, शुभम जाधव, मनोज जाधव, रोहीत जाधव, दीपक सोळवंडे, अजित भोसले, अमोल भोसले, अभिजीत पाटोळे, बारक्या उर्फ तुषार थोरवडे यांच्या हालचाली पडताळल्या. अचानक एवढं मोठं कोंबिंग ऑपरेशन राबवून देखील दुसऱ्या दिवशी सर्व काही बिनदिक्कतपणे सुरू होतं.