शहापूर फाट्यावर पकडला 5 किलो गांजा; एकास अटक तर एक झाला पसार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | मसूर ते कराड जाणार्‍या रस्त्यावर पिंपरी गावचे हद्दीत प्राजक्ता किराणा स्टोअर जवळ शहापूर फाटा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस कार्यालयातील पथकाने सापळा रचून कारवाई केली. यामध्ये विक्रीसाठी घेऊन निघालेला सुमारे पाच किलो गांजा असा एकूण 1 लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पकडल्याची घटना गुरुवार, दि. 24 रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विक्री करण्याच्या उद्देशाने चोरटी वाहतूक करून गांजा ताब्यात मिळाल्या प्रकरणी एक जणास अटक करण्यात आली असून एक जण दुचाकी वरून पळून जाण्यात यशस्वी झाला. गणिशा मिनूलाशा फकीर (वय 48, रा. वाण्याचीवाडी, ता. कराड, जि. सातारा) व आझाद पूर्ण नाव माहित नाही अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीं गणिशा फकीर यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

याबाबत माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर यांना बातमीदार मार्फत, कराड ते मसूर जाणार्‍या मार्गाने गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी उपविभागीय अधिकारी कराड यांचे सपोनि अमीत बाबर यांना उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी योग्य ती पुढील कारवाई करावी, अशा सुचना दिल्या.

त्यानंतर उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक, पिंपरी गावच्या हद्दीत शहापूर फाट्याजवळ प्राजक्ता किराणा स्टोअर समोर दबा धरून बसले असताना रात्री सव्वाअकरा वाजण्याचे दरम्म्यान बजाज डिस्कव्हर मोटार सायकलने आलेल्या इसमांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सुमारे पाच किलो गांजा मिळून आला. यावेळी पोलिसांनी गणिशा फकीर ताब्यात घेतले तर आझाद हा दुचाकीवरून पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी गणिशा मिनुलाशा फकीर व आझाद या दोघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस ना. सागर हणमंत बर्गे यांनी मसूर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सपोनि विठ्ठल शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ए. एम. खरात करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाचक सपोनि अमीत बाबर, पो. हवालदार पवार, पो. ना. सागर बर्गे यांनी केली.