कराड प्रतिनिधी । कराड शहर परिसरातील एका गावात गुरुवारी अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई करीत बाल विवाह लावणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीचा विवाह खटाव तालुक्यातील युवकाशी ठरविला होता. त्यांच्या याद्या संबंधित मुलीच्या घरी करण्यात आल्या होत्या. दोघांच्या विवाहाची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करत पोलिसांना साध्या वेशात पाठवून खात्री करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलिस कर्मचारी प्रशांत चव्हाण, दीपा पाटील, अमोल फल्ले, आसिफ जमादार, दीपक कोळी, सागर बर्गे, प्रवीण पवार, संताजी जाधव यांच्यासह पोलिसांनी बालविवाहाची तयारी सुरू असलेल्या ठिकाणावर जाऊन माहिती घेतली. ज्या मुलीच्या विवाहाची तयारी सुरू होती, ती मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री पटताच पोलिसांनी मुलीच्या कुटूंबियांना ताब्यात घेतले. त्यांना उपविभागीय पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली. अल्पवयीन मुलीचे निर्भया पथकाच्या दिपा पाटील यांच्या माध्यमातून समुपदेशन केले. तिच्या कुटूंबियांचे जबाब नोंदवला आहे.